ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचा अपघात; तेलविहिरीपासून 5 मिनिटांवर असताना दुर्घटना, चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुहू येथील पवनहंस येथून सकाळी उड्डाण केलेल्या ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरला अरबी समुद्रात झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. यात तीन ओएनजीसी कर्मचारी तर एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटसह 9 ओएनजीसी कर्मचारी होते. तेल विहिरीपासून केवळ 5 मिनिटांवर असताना हा अपघात झाला.

जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवरून ओएनजीसीच्या सागर किरण या तेलविहिरीकडे जाण्यासाठी ओएनजीसीचे 7 कर्मचारी आणि दोन पायलट यांनी मंगळवारी सकाळी उड्डाण केले. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीमुळे हेलिकॉप्टर 11 वाजून 45 मिनिटांनी पाण्यात कोसळले. याची माहिती मिळताच तटरक्षक दल, नौदल आणि ओएनजीसीच्या बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. तीन्ही पथकांनी योग्य समन्वय राखून तातडीने बचाव आणि शोधकार्य करत 9 जणांना पाण्याबाहेर काढले. मात्र, यातील चार जण बेशुद्ध होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. यात तीन ओएनजीसी कर्मचारी तर एक चौथी व्यक्ती ही ओएनजीसीचा कंत्राटी कर्मचारी होती, असे ओएनजीसीच्या अधिकार्याने सांगितले. दरम्यान, ओएनजीसी आणि डीजीसीए या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • पवनहंस कंपनीने काही दिवसांपूर्वीच सहा सिकोर्रस्की हेलिकॉप्टर्स भाड्याने घेतली आहेत. त्यातील हे एक हेलिकॉप्टर आहे.
  • अरबी समुद्रामधील बदलत्या आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
  • हेलिकॉप्टरला पाण्यावर उतरताना लँडिंग करताना काही त्रास होऊ नये यासाठी फ्लोटर्स लावले जातात. मात्र, फ्लोटर्स असूनही लँडिंग करताना ते योग्य पद्धतीने लँड झाले नसावे. त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली असावी, अशी शक्यता ओएनजीसीने व्यक्त केली आहे.