आभाळमाया – मंद झाला ‘काक्षी’ का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

रात्रीच्या  आकाशातलं सुंदर नक्षत्र म्हणजे मृग. खगोलशास्त्र नव्याने शिकणाऱ्या व्यक्तीलाही आकाशातील हे व्याधाच्या बाणाने घायाळ झालेले पळते हरीण म्हणजेच मृग ठाऊक असतं. कुणी याच्या आकारावरून त्याला ‘खाटलं बाजलं’सुद्धा म्हणतात. ग्रीक निरीक्षकांनी याच आकारात ‘ओरायन’ नावाचा योद्धा पाहिला. अवकाशस्थ आकारांमध्ये विविध मास निर्माण व्हावेत असेच त्यांचे स्वरूप असते. मृगाची महती अशी की, या एकाच तारका समूहावरून अनेक खगोलीय संकल्पना स्पष्ट करता येतात.

विश्वाचा ‘जन्म’ 13.7 अब्ज वर्षांपूर्वी एका महाप्रसारणातून निर्माण झाला असे आता मानले जाते. तसे भौतिकशास्त्रीय पुरावेही उपलब्ध झाल्यामुळे, ‘बिग बँग’ नावाने ओळखला जाणाऱ्या सिद्धांताला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे विश्व ‘अनादि अनंत’ असल्याची ‘स्थिरविश्व’ किंवा ‘स्टेडी स्टेट’ थिअरी मागे पडली असली तरी ‘प्रसरणशीलता’ हे वैश्विक उक्रांतीमधला एक टप्पा आहे का यावर चर्चा होतच असते. या चर्चा ‘ऍकॅडेमिक’ असल्याने ‘वादे वादे जायते तत्त्वबोध’ या न्यायाने त्यातून नवे काही सापडू शकते.

विश्वाचा जसा ‘जन्म’ झाला आहे तसाच आपण पाहत असलेल्या (अवघ्या चार टक्के दृश्य) विश्वातील प्रत्येक गोष्टीला विविक्षित जन्मवेळ आहे. मागच्या लेखात आपण वाचली ती विश्वनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील सूक्ष्म कृष्णविवरे होती. नंतरही अनेक तारे, तेजोमय, दीर्घिका, कृष्णविवरे, ग्रहमाला, धूमकेतू, लघुग्रह, अशनी यांची निर्मिती होत राहिली. आताही विश्वात कुठे ना कुठे अशा घडामोडी घडतच असतात.

त्यामुळेच एखाद्या ताऱ्याचाही जसा जन्म होतो तसाच मृत्यूही घडतो. सुमारे दहा अब्ज वर्षांचे ‘आयुष्य’ असलेल्या सूर्याला मानवी प्रजातीने ओळखायला आरंभ केला तेव्हापासून तो पन्नाशीला आलेला आहे. आपल्याला रोज उगवलेला तेजस्वी सूर्य दिसतो तो आता पोक्त वयातला. त्याची ‘शंभर’ म्हणजे आणखी पाच अब्ज वर्षे पूर्ण झाली की आधी त्याचे लाल महाकाय ताऱ्यात रूपांतर होईल. त्यावेळी तो पृथ्वीच नव्हे तर मंगळापर्यंतचे ग्रह गिळून टाकेल. त्यानंतर कालांतराने तो मंद होत कायमचा ‘अस्त’ पावेल. अर्थात ग्रहमालेतील आपल्यासारखी जीवसृष्टी त्याच्या कितीतरी आधी नष्ट झालेली असेल. त्याला खूप अवधी आहे. तोपर्यंत आपण विश्व बऱ्याच अंशी जाणून घेतलेले असेल. अर्थात, प्रदूषण आणि अणुयुद्ध वगैरे संकटातून आपण पृथ्वी सहीसलामत ठेवली तरच!

आपल्या सूर्याचा अखेरीस श्वेतखुजा (व्हाईट ड्वार्क) होणार आहे, मात्र आजही आपल्याला अवकाशात मृत्युपंथाला लागलेले निवडक ठळक तारे दिसतात. वृश्चिक राशीतील ज्येष्ठ नक्षत्राचा तारा (अन्हेरेस) असास ‘रेडजायन्ट’ आहे. मृग नक्षत्रातला काक्षी किंवा ‘बिटेलग्युज’ त्याच प्रकारच्या रक्तवर्णी महातारा आहे. आपल्यापासून सुमारे प्रकाशवर्षे अंतरावर असलेला हा तारा नुसत्या डोळय़ांनीही स्पष्ट दिसतो. तो मृगातला मृत्युपंथाला लागलेला वृद्ध तारा तर मृगाच्या शेपटीमधल्या तेजोमेघात (ओरायन नेब्युला) हजारो नवतारे जन्माला घालण्याची क्षमता आहे. मृग नक्षत्रातला राजन्य (रिगेल) तारा म्हणजे दोन ताऱयांची जोडी (द्वैती तारे) आहे. असे मृग हे ‘परिपूर्ण’ नक्षत्र. शिवाय ‘व्याध’ हा रात्रीचा सर्वाधिक ठळक तारा याच तारकासमूहाचा भाग! (तिथे काही सूक्ष्म कृष्णविवरेही असतील.)

गेल्या दोन वर्षांत खगोल संशोधकांना मृगातील काक्षी ताऱ्याने बुचकळय़ात टाकले होते. तो पृथ्वीपासून 642 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. 2019 मध्ये अचानक या लालेलाल ताऱ्याचे तेज मंद होऊ लागले. म्हणजे आता तिथे विस्फोट होऊन मृगातील नवा तेजोमेघ जन्माला येतो की काय इतपत तर्क केले जाऊ लागले. या लाल ताऱ्यातील प्रचंड उष्णतेमुळे, त्या उष्णतेचे रूपांतर आता वाफ किंवा वायूमध्ये होऊ लागले असावे आणि त्याचा ‘ढग’ या ताऱ्याच्या पृष्ठभागावर दाटून त्याचे तेज मंदावले असावे असा पहिला तर्क होता. मग वाटलं की, हा या ताऱ्यावरचा ‘डस्ट क्लाऊड’ (धुळीचा मेघ) असावा. ‘स्पिअर’ किंवा ‘स्पेक्ट्रोपोलॅरिमेट्रिक हायकॉण्ट्रास्ट हेक्झोप्लॅनेट रिसर्च’ एवढय़ा लांबलचक नावाच्या प्रकल्पाने आता या दोन्ही शक्यता जमेस धरून संशोधन सुरू केलंय. 1947 मध्ये ‘काक्षी’ असाच मंदावला होता असे म्हणतात. पण गेल्या दोनशे वर्षांमधल्या त्याच्या तेज बदलाची ठोस नोंद नाही असेही सांगितले जाते. 2019 मध्ये निरीक्षकांना असा ‘चकवा’ देणारा काक्षी ‘तेजोमेघ’ वगैरे झाला नाही. तो 2020 मध्ये पूर्ववत चमकायला लागला. आता जपानी भूस्थिर उपग्रह ‘हिमवारी’ने काक्षी पूर्ववत असल्याची पुष्टी केली आहे, पण चमचमता आकाशातील असेच ‘चकवे’ बरेच काही शिकवून जातात.

[email protected]