
26 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या 400 न्यायालयीन सुनावणींनंतर, आता 70 वर्षांच्या राम रतन यांना न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. 1996 साली राम रतन यांच्यावर देशी बनावटीची बंदुक म्हणजेच ‘गावठी कट्टा’ बाळगल्याच्या आरोप होता. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एडीजे-11 न्यायालयाने राम रतन यांना आरोपातून मुक्त केले आहे.
न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशानंतर, रोजंदारीवर काम करणाऱ्या रतन यांनी आपला संताप व्यक्त केला, ते म्हणाले की “माझी निर्दोष मुक्तता झाली परंतु आता आनंद साजरा करण्यासारखे काहीच उरले नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या खोट्या केसमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझ्याकडील सर्व पैसे संपले आहेत. माझी मुले आता जगू शकत नाहीत. त्यांचे शिक्षण ते पूर्ण करू शकत नाहीत. माझे अर्धे आयुष्य न्यायालयीन सुनावणींना हजर राहण्यात वाया गेले आहे.”
रतन यांनी त्यांच्या घरात गावठी कट्टा लपवल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 2 नोव्हेंबर 1996 रोजी सकाळी पोलिसांनी रतन यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. मात्र यावेळी रतन यांनी मला फसवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. माझ्याकडे गावठी कट्टा नसून, मला फसवण्यात आले आहे. मी गावातील राजकारणाचा बळी ठरलो असून मी निर्दोष आहे. असे रतन यांचे म्हणणे होते.
त्या वेदनादायक दिवसांची आठवण करून” रतन म्हणाले की “तेव्हा मी 44 वर्षांचा होतो. कोणतीही सूचना न देता पोलिसांनी मला ताब्यात घेतले. ते मला स्थानिक पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले. माझ्याकडे शस्त्र असल्याचा दावा पोलिसांनी केला, पण न्यायालयात ते पुरावा हजर करू शकलो नाही. माझ्यावरील आरोप खोटे ठरवण्यासाठी मी जवळपास तीन दशके लढलो. शेवटी सत्याचा विजय झाला, पण याबदल्यात मला खूप मोठी किंमत चुकवावी लागली.”
राम रतन यांचे वकील राजेंद्र कुमार भटनागर म्हणाले की, रतन यांची 2020 मध्येच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र सरकारी वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रकरण पुन्हा सुरू झाले.
























































