जालन्यातून आणलेले 30 टन लोखंड पाथर्डीतून जप्त एकजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिह्यातील अंबड येथून फसवणूक करून पाथर्डी तालुक्यातील चांदगाव येथे आणलेले 30 टन लोखंड अंबड पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुजित सुधाकर बेळगे (रा. वाळुंज, ता. पाथर्डी) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस स्टेशन हद्दीत फसवणूक करून ट्रकमध्ये भरलेले लोखंड चालकांनी लंपास केल्याची घटना 15 जून रोजी घडली होती. याप्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनला चालक दत्तात्रय कर्डिले (रा. लातूर) व इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रकचालक दत्तात्रय कर्डिले याने हे लोखंड सोलापूरला देण्याऐवजी त्याच्या पाथर्डी तालुक्यातील वाळुंज व चांदगाव येथील साथीदाराच्या मदतीने चांदगाव येथील महादेव मंदिराजवळ ठेवले होते. याप्रकरणी पाथर्डी पोलीस व जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदजाव येथे छापा टाकून सुजित बेळगे याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, कुमार कराड, संजय बडे यांनी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक जी. के. कौळासे, पोलीस कर्मचारी एस. सी. अटोळे, जयवाळ, देवीदास भोजने, बी. के. खरात, सुशील कारंडे, अशोक नागरगोजे यांना मदत केली.