
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण होत असतानाच काल रात्रीपासून पावसाची संततधार कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस अजून दोन दिवसांपर्यंत हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा तसेच पंचगंगेसह इतर नद्या इशारा पातळीलगत अवघ्या सात ते आठ फूट दूर असताना जिह्यावर महापुराची टांगती तलवार अजूनही कायम आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तात्पुरत्या स्थलांतराची तयारीही करून ठेवली आहे.
तीन दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, 39 फूट इशारा व 43 फूट धोकापातळी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी पहाटे 32.6 फुटांवर स्थिरावली होती. अकरापर्यंत 32.5 फूट झाली. त्यानंतर तासाला एक इंचाने पातळीत घट होऊन सायंकाळी ती 32.2 फुटांवर स्थिरावली होती. तासाभराने यात आणखी एक इंचाची घट झाली. अजूनही पंचगंगेसह इतर सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेरच आहे.
शिरोळ वगळता जिल्ह्यात जोरदार पाऊस
कोल्हापूर जिह्यात कालही दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 80.6 मिमी पावसाची नोंद झाली. हातकणंगले 7, शिरोळ 4.1, पन्हाळा 28.8, शाहूवाडी 24.6, राधानगरी 35.1, करवीर 15.2, कागल 18, गडहिंग्लज 19.1, भुदरगड 44.3, आजरा 42.5 आणि चंदगड तालुक्यात 32.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
राधानगरी धरणातून 1200 क्युसेकने विसर्ग
सायंकाळी राधानगरी धरणात 40.42 टक्के पाणीसाठा झाला होता. धरणातून 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. याशिवाय जिह्यातील धरण प्रकल्पांत पाणीसाठय़ाची आकडेवारी (टीएमसी) पुढीलप्रमाणे – तुळशी 1.56, वारणा 13.89, दूधगंगा 8.68, कासारी 1.33, कडवी 1.03, कुंभी 1.32, पाटगाव 1.60, चिकोत्रा 0.72, चित्री 0.70, जंगमहट्टी 0.53, घटप्रभा 1.56, जांबरे 0.63आणि आंबेआहोळ 0.72, तर कोदे लघुप्रकल्प काल दुपारीच पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पंचगंगा नदीवरील बंधाऱयांची पाणीपातळी ः राजाराम 32.2 फूट, सुर्वे 30, रुई 60.11, इचलकरंजी 57.03, तेरवाड 49.09, शिरोळ 38.09 आणि नृसिंहवाडी येथे 35 फूट.
जिह्यातील 26 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे. कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव. कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे. दूधगंगा नदीवरील- दत्तवाड. तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील – चिंचोली असे एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत.























































