काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः या निवणुकीत सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे त्यांनीच आज झालेल्या राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीला आदरणीय शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे उपस्थित होते. राष्ट्रवादीने अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे.
यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीत केल्या.





























































