
हैदराबाद येथील रामकृष्णा मंडा यांनी शिर्डीच्या साईबाबांना 707 ग्राम वजनाचा आणि 33 लाख 5 हजार 225 रुपये किमतीचा सोनेरी मुकुट दानस्वरूपात दिला आहे. मंडा यांच्या परिवाराने केलेला नवस पूर्ण झाल्याने हा सुवर्ण मुकूट साईचरणी अर्पण केला.1992 साली केलेल्या नवसाची फेड म्हणून रामकृष्ण मंडा यांच्या परिवाराने हे दान केलं आहे.
शिर्डीच्या साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक साईबाबांना विविध स्वरूपात दान देत असतात. नुकतच गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तिन दिवसात भाविकांनी साईबाबांना 5 कोटी 12 लाख रोख दान दिल होत. त्यानंतर आज पाऊण किलोचा साईमुकूट रामकृष्ण मंडा यांनी दान स्वरूपात दिला आहे. साईबाबांवर आमची निस्सीम श्रद्धा असून जे काही मागितलं, त्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याचं दानशुर भक्त रामकृष्ण मंडा यांनी सांगितले.
कोविड संकटाच्या दोन वर्षाच्या काळात साईमंदिर बंद असल्याने दानाचा ओघ कमालीचा मंदावला होता. मात्र, मंदिर सुरू झाल्यानंतर दानाचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीच्या अर्थकारणाची रूतलेली चाके धावू लागली आहेत.



























































