ठसा – भूपिंदर सिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

हिंदुस्थानी संगीत विश्वातील अव्वल दर्जाचे संगीतकार, गझल गायक आणि बॉलीवूडचे विख्यात पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांच्या निधनामुळे या तिन्ही क्षेत्रांची अपरिमित हानी झाली आहे. कितीतरी दर्दभऱया, हृदयस्पर्शी गाणी आणि गझलांनी त्यांनी तब्बल पाच दशपं रसिक, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सिंग यांचा जन्म पंजाब प्रांतात पटियाळा येथे झाला. वडील प्रोफेसर नथ्थासिंग शिस्तीचे संगीत शिक्षक होते. भूपिंदर यांनी संगीत शिक्षणाचे प्राथमिक धडे वडिलांकडे घेतले. मात्र त्यात त्यांना फार रस नसायचा. पण पुढील काळात गायकी आणि संगीत क्षेत्राची त्यांना आवड निर्माण झाली.

याच काळात ते गिटार आणि व्हायोलिन वाजवायला शिकले. पंजाब आकाशवाणी पेंद्रावर ते गायनाचे कार्यक्रम करीत. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. पुढे ते दूरदर्शनवर रुजू झाले. तेथील वास्तव्यात प्रख्यात संगीतकार मदन मोहन यांनी भूपिंदर यांचे गाणे ऐकले. भूपिंदर यांच्या मिठास स्वरांनी मदन मोहन प्रभावित झाले व त्यांनी त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. 1964 सालची ही घटना होय. चेतन आनंदचा ‘हकीकत’ या चित्रपटात त्यांना गायनाची संधी मदन मोहन यांनी दिली.

त्यांच्यासोबत सहगायक तलत महेमूद, मोहम्मद रफी आणि मन्नाडे होते. सात मिनिटांच्या गाण्यात त्यांचा आवाज होता. या तिघांनी मिळून गायलेले गाणे होते. ‘हो के मजबूर मुझे उसने बुलाया होगा…’ संगीतकार खय्याम यांनी त्यांनी एकल गाण्याची पहिली संधी ‘आखरी खत’ या चित्रपटात दिली. त्यात त्यांच्या आवाजातील ‘रुत जवान जवान’ या गाण्याने दर्दभरी आणि मधाळ आवाजाचे गायक अशी ओळख देण्यास सुरुवात केली. भूपिंदर यांच्या आवाजाने रसिक भारावले, दाद देऊ लागले आणि तेव्हापासून त्यांच्या चित्रपट गीत पार्श्वगायनाचा सिलसिला सुरू झाला. ‘दिल ढूंढता है (मौसम), थोडी सी जमी, थोडा आसमां (सितारा), करेंगे याद तो, हर बात याद आयेगी (बाजार), दो दीवाने शहर मे, एक अकेला इस शहर में (घरौंदा), बीती ना बिताई रैना (परिचय), जिंदगी इतनी मुख्तसरभी नही (गझल), जिंदगी मिलके बिताएंगे (सत्ते पे सत्ता), साथी तेरे नाम (उस्तादी उस्ताद से), किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. (ऐतबार), कभी किसी को मुकमल जहाँ नही मिलता (आहिस्ता आहिस्ता), आज बिछडे है (थोडीसी बेवफाई), हुजर इस कदर भी ना (मासूम), जिंदगी मेरे घर आना (दूरियां), जब अंधेरा होता है (राजा-रानी), मीठे बोल, एक ही ख्वाब कईबार देखा है मैने (किनारा), आवाज दी है (ऐतबार), जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे (दूरिया), बादल से काट काट के… (सत्या)’ यांसारख्या गाण्यांचा उल्लेख देता येईल. खरे तर भूपिंदर यांनी मोजकीच, पण उत्तम गाणी गायली. यात काही एकल तर काही युगल होती.

लता मंगेशकर यांच्या सोबतचे ‘नाम गुम जाऐगा, दिल ढूंढता है’ असो, आशा भोसलेंसोबतचे ‘किसी नजर को तेरा’ असो, रूना लैलासोबतचे दो दीवाने असो, नाहीतर अनुराधा पौडवाल यांच्या सोबतचे जिंदगी मेरे घर आना असो, ती अजरामरच आहेत. सुरेश वाडकर यांच्या सोबतचे ‘हुजूर इस कदर भीना इतराके चलिये’ असेच वेगळे गाणे म्हणता येईल. मिर्झा गालीब या मालिकेतही त्यांची गाणी होती. पंजाबच्या आकाशवाणी पेंद्रावरचा गझल गायकाचा आवाज अनेक हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायनातून देशभरात, घराघरांत पोहचला. एवढेच नाहीतर मराठीतही त्यांनी ‘हसलीस एकदा भिजल्या शारद राती, बहरली फुलांनी निशिगंधाची नाती’ यासारखी भावगीतं गायलेली आहेत. दिवंगत संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांचा प्रदीर्घ काळ ऋणानुबंध होता. या जोडीने दम मारो दम, वादियां मेरा दामन, चुरा लिया है, चिंगारी कोई भडके, तुम जो मिल गये हो, यासारखी अनेक गाणी लोकप्रिय केली. गझल प्रांतातही भूपिंदर सिंग यांनी आपल्या गायन कौशल्याची अमीट छाप सोडली आहे. 1980 च्या सुमारास ते बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत विवाहबद्ध झाले. दोघांचाही गाणी-गझल हा समान आवडीचा धागा होता. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा व संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा प्रवास सुरेल होत गेला. एका बाजूला जगजीत सिंह – चित्रा सिंह ही जोडी आणि दुसऱया बाजूला भूपिंदर – मिताली यांची जोडी. यामुळे गझलेचा प्रांत सशक्त आणि समृद्ध होत गेला. भूपिंदर यांच्या जाण्याने संगीत विश्व पोरके झाले असून दर्दभरी, मधाळ गझलही निःशब्द झाली आहे.