
शिवसेना सोडून जे गेले त्या गद्दारांना काय कमी केले होते? सत्ता, पद, अधिकार सारे काही देऊनही असुरी महत्त्वाकांक्षेपोटी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा केली. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले. माणुसकीवर आघात करणारी ही गद्दारी आहे. आता त्याला ‘बंड’, ‘उठाव’ वगैरे शब्दांचा मुलामा देण्यात येत आहे. बंड हे सत्यासाठी केले जाते. त्यामुळे बंड, उठाव हे शब्द गद्दारांच्या तोंडी शोभत नाहीत! सुरत, गुवाहाटीत मौजमजा केली. गोव्यात नाचगाणे करून धिंगाणा घातला अन् बेकायदा सरकार आणले. गद्दारीच्या पायावर उभारलेल्या या घटनाबाह्य सरकारचा डोलारा कोसळणारच, असा ठाम विश्वास शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनिमित्ताने संभाजीनगर जिल्हा भगव्या विचाराने ढवळून निघाला आहे. शिवसंवाद यात्रेचे तुफान आज गद्दार आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात धडकले. आदित्य ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी बिडकीन येथे अक्षरशः शिवसैनिकांचे मोहोळ उठले होते. शिवसंवाद यात्रा बिडकीनच्या शिवेवर येताच पदयात्रा काढण्यात आली. तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी तब्बल 501 किलो वजनाचा हार घालून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
बसस्थानकासमोर झालेल्या विशाल सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारांची सालटीच काढली. कोरोनाकाळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली, परंतु त्यांच्यावर गद्दारांनी आरोपांची राळ उडवली. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा हे कटकारस्थान करण्यात मश्गूल होते. संदीपान भुमरे यात आघाडीवर होते. उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला तेव्हा हे माणुसकी, निष्ठेचा बाजार मांडून सुरतला पळाले. त्यामुळे आम्ही बंड केले, उठाव केला वगैरे हे शब्द यांच्या तोंडी शोभत नाहीत. गद्दारीच केली! माणुसकीच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, तालुकाप्रमुख मनोज पेरे व सरपंच सारिका पेरे आदींची उपस्थिती होती.
सगळे तर दिले, आणखी काय पाहिजे होते?
संदीपान भुमरे यांना प्रेम, जिव्हाळा, ताकद, हिंमत, ओळख, पद, प्रतिष्ठा सगळे तर दिले. त्यांना आणखी काय पाहिजे होते? पाच वेळा शिवसेनेच्या तिकिटावर भुमरे निवडून आले. त्यांना कॅबिनेट मंत्री केले. एवढे सगळे देऊनही यांचे पोट भरले नाही. शेवटी गद्दारी करून निघून गेले. गद्दारीच्या भुसभुसीत पायावर उभे असलेले आणि धोकेबाजीने आणलेले हे सरकार कोसळणार असून विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
गद्दारांविरुद्ध राग नाही, दुःख आहे
शिवसंवाद यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी पत्रकार, राजकीय विश्लेषक विचारतात, ‘आदित्य तुम्ही सध्या आक्रमक दिसत आहात.’ मात्र मी कुठेही आक्रमक झालेलो नाही. गद्दारांविरुद्ध माझ्या मनात कुठलाही राग नाही, द्वेष नाही. पण दुःख जरूर आहे. हेही तितकेच खरे आहे. ज्यांना ‘मातोश्री’त बघितले, ज्यांचा प्रचार केला त्यांनीच हा गद्दारी केली मग हे आपलेच होते का? असा प्रश्न पडतो, त्याचे दुःख जास्त होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱयांमुळे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात 2019 च्या निवडणुकीचा संदर्भ दिला. पैठण येथे झालेल्या जाहीर सभेत देविदास पठाडे या शिवसैनिकाने संदीपान भुमरे हे पाचव्यांदा निवडून येणार आहेत. त्यांना मंत्रीपद दिले पाहिजे अशी मागणी केली होती. पठाडे यांना मी शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला. भुमरे कॅबिनेट मंत्री झाले. देविदास पठाडे यांचा मुलगाही सभेला आलेला होता. आदित्य ठाकरे यांनी त्याला व्यासपीठावर बोलावले. यांच्या शेतकरी वडिलांमुळे भुमरे मंत्री झाले आणि आता शिवसेनेबरोबरच त्यांनी मतदारांशीही गद्दारी केली, असे आदित्य ठाकरे म्हणताच टाळय़ांच्या कडकडाटात ‘आता गद्दारांना माफी नाही’ अशी घोषणा घुमली.
































































