
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात हिंदुस्थानच्या अष्टपैलू अक्षर पटेलने आपल्या बॅटच्या पराक्रमाने टीम इंडियासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱया वन डेतील थरारक विजय आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सलग 12वा विक्रमी मालिका विजय रेखाटला. आजच्या या विजयाने एखाद्या देशाच्या संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका विजय साकारण्याचा विश्वविक्रम आता हिंदुस्थानी संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. हिंदुस्थानी संघाने आज तो मोडला. पाहुण्या हिंदुस्थानने 3 वन डे लढतीच्या मालिकेत 2-0 अशी अभिजित आघाडी घेतली आहे.
अक्षरची विजयी रांगोळी
हिंदुस्थानी संघाच्या विजयाचा पाया श्रेयस अय्यर (71 चेंडूंत 63) आणि यष्टिरक्षक संजू सॅमसन (51 चेंडूंत 54) यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी साकारत रचला. त्यावर कळस चढवण्याचे काम डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने केले. अक्षरने 312 धावांचा कठीण पाठलाग करणाऱया आपल्या संघाला अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत विजयाचे अनमोल गिफ्ट दिले. त्याने 3 चौकार आणि 5 षटकार फटकावत नाबाद 64 धावांची खेळी केली. अक्षरचे हे वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज – 50 षटकांत 6 बाद 311 (शाय होप 115, कायिल मायर्स 39, शामार ब्रुक्स 35, निकोलस पूर्ण 74; शार्दूल ठाकूर 54 धावांत 3 विकेट, अक्षर पटेल 40 धावांत 1, दीपक हुडा 42 धावांत 1 विकेट) पराभूत वि. हिंदुस्थान – 49.4 षटकांत 8 बाद 312 (शुभमन गिल 43, श्रेयस अय्यर 63, संजू सॅमसन 54, अक्षर पटेल नाबाद 64; अलझारी जोसेफ 46 धावांत 2 विकेट, कायिल मायर्स 48 धावांत 2 विकेट)




























































