मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरुच; यवतमाळ तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये चांगले बरसायला सुरुवात केली. पाऊस जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला बसरला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात नदीनाले तुडंब भरले आहेत. तसेच अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे. आता यवतमाळमधील तीनही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गेल्या सात आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. परिणामी जलसिंचन विभागाकडून अडाण , बेंबळा आणि पुस या तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण धरणातून पाणी सोडल्यामुळे बोरीअरब येथे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोला यवतमाळ या राज्य महामार्गावर वाहतूक थांबली आहे . ही वाहतूक नेरमार्गे वळविण्यात आली आहे. दारव्हा तालुक्यातील हातनी येथील गावकऱ्यांना बाहेरगावी जायचे असेल तर अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागत आहे.