
अकरावी प्रवेशासाठी येत्या 5 ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी झळकणार आहे. सीबीएससीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, आता अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय बोर्डाने एकाच दिवशी दहावी-बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रतीक्षा संपली आहे.
सोलापूरला अकरावीसाठी 76 हजारांहून अधिक प्रवेश क्षमता आहे. कला, वाणिज्य व शास्त्र्ा शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकूण 50 हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेशापासून कोणी वंचित राहणार नाही. याबाबतचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.
राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू केली. दि. 23 जून ते 5 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, सीबीएससीचा निकाल लांबल्यामुळे गुणवत्तायादी जाहीर झाली नव्हती. आता सीबीएससीचा निकाल लागल्याने प्रवेश अर्ज दाखल होणार असून, आठवडाभरात गुणवत्ता यादी लावून प्रवेश देण्यास सुरुवात होईल. राज्य बोर्डाचे एकूण 63 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच केंद्रीय बोर्डाने एकाच दिवशी दहावी-बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रतीक्षा संपली आहे.
प्रवेशासाठी देण्यात आलेल्या सूचनांचा अवलंब करून यादी तयार करण्यात यावी. यात कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश निश्चित करावेत, असे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सांगितले.




























































