शास्तीमाफीचा लाभ घ्या; अन्यथा जप्तीची कारवाई, नगर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर मागील कराची एकूण थकबाकी सुमारे 188 कोटी रुपये असून, त्यामध्ये 101 कोटींची शास्तीची थकबाकी आहे. महापालिकेने शंभर टक्के शास्तीमाफीची घोषणा केली असून, 31 ऑगस्टपर्यंत करदात्यांना दंडाची रक्कम माफ करून सवलत दिली जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन नगरकर करदात्यांनी 31 ऑगस्टपर्यंत कर भरावा; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. जावळे यांनी दिला आहे.

महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी विभागप्रमुख व वसुली क्लार्कची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, महापालिकेच्या कर्मचाऱयांनी आता महापालिका ही माझी संस्था आहे, हे समजून तिचे प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. मी आता कुठल्याही कर्मचाऱयाची तक्रार ऐकून घेणार नाही. तुमच्या माध्यमातून नगरकरांना उत्तम सेवा द्यायची आहे. मनपा ही नगरकरांना सुविधा देण्यासाठी असून, फक्त तुमच्या पगारासाठी नाही. नागरिकांच्या खिशातून आलेल्या पैशांतून तुमचे पगार होतात. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रश्न सोडविणे शक्य होत नाही. त्यासाठी 20 वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने नियोजन करा. एक महिन्याचे वसुलीचे नियोजन करून नागरिकांमध्ये शास्तीमाफीची जनजागृती करा. आपला संपर्क थेट मालमत्ताधारकांशी आहे. पैसे भरण्यासाठी नागरिकांची वाट पाहू नका; त्यांच्या घरी जाऊन शास्तीमाफीची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी अधिकाऱयांना केले.

शंभर टक्के शास्तीमाफी देऊनही नागरिकांनी कर भरला नाही तर मालमत्तेची जप्ती करून लिलाव प्रक्रिया राबवणार आहोत. याबाबतही नागरिकांना माहिती देऊन शास्तीमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन करा. दिवस-रात्र काम करा; हलगर्जीपणा करू नका. अनेक कर्मचाऱयांची मानसिकता नकारात्मक आहे. ती बदलावी लागेल, अशी सूचनाही डॉ. जावळे यांनी केली.

13 ऑगस्टला लोकअदालत

जिल्हा न्यायालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी लोकअदालत होत असून, यामध्ये सुमारे 14000 थकबाकीची प्रकरणे ठेवायची आहेत. या सर्व थकबाकीदारांना तातडीने नोटिसा पाठवा. यापुढील एक महिना कोणत्याही कर्मचाऱयाला सुट्टी दिली जाणार नाही. कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ऑफिस सुरू राहणार आहेत. कामचुकार कर्मचाऱयांचे इक्रिमेंट व पेन्शनवर शेरा मारण्यात येईल. यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे व मनपाच्या माध्यमातून नगरकरांना विकासाच्या सुविधा द्याव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. जावळे यांनी केले.