
आसामधील वेगवेगळ्या जिल्ह्यातून बुधवारी आसाम पोलिसांनी तब्बल 11 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक जण हा मदरशातील शिक्षक असून हे सर्व जण अल कायदाशी संबंधित अल कायदा इंडियन सब कॉन्टिनेंट आणि बांगलादेशमधील अन्सरुल्ला बांगला टीम या दहशतवादी संघटनांचे सदस्य आहेत. या कारवाईमुळे यंत्रणांनी इशान्य हिंदुस्थानातील अलकायदाचे मोड्यूल उद्ध्वस्त केले आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे आसाम पोलिसांनी मोरिगाव, बारपेटा, गुवाहटी, गोपालपाडा या चार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. त्यानंतर या चार ठिकाणांहून पोलिसांनी 11 जणांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक मुस्तफा उर्फ मुफ्ती मुस्तफा हा मोरिगाव जिल्ह्यातील सहारिया गावचा रहिवाशी आहे. तो बांगलादेशची दहशतवादी संघटना अन्सरुल्ला बांगला टीमसाठी काम करायचा. तो या दहशतवादी संघटनेचे हिंदुस्थानातील सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायचा.
मुस्तफा हा सहारिया गावाता जामिऊल हुदा नावाचा एक मदरसा देखील चालवायचा. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मदरसा देखील सिल केला आहे. ”त्याच्या मदरश्यामधील सर्व गोष्टींसाठी दहशतवादी संघटनांकडून पैसा यायचा. तसेच तेथील दहशतवाद्यांसाठी एक लपण्याचे ठिकाण देखील बनला होता”, असे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेला अफसरुद्दीन भुयान हा मोरिगावचा, अब्बास अली हा गोपालपाडाचा रहिवासी आहे. यांच्याव्यतिरिक्त पोलिसांनी मेहबुबुर रेहमान उर्फ मेहबुब, जुबेर खान (25), रफिकुल इस्लाम (27), हमिदुल इस्लाम (20), मोईनुल हक (42), काजीबूर हुसेन (37), मुझिबोर रहमान (50), शहानूर अस्लम (32), शहाजहान अली (34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.




























































