माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या गोलंदाजी ताफ्यातील बुलंद तोफ असलेले सदानंद मोहोळ यांचे शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. सदानंद मोहोळ यांच्या पश्चात पत्नी शीला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी दुपारी 12 वाजता वैपुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्राच्या क्रिकेटचा देशभरात दरारा निर्माण करणारे आणि राज्याच्या क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात मोलाचे योगदान दिलेल्या सदानंद मोहोळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे समकालीन क्रिकेटर व माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव रियाझ बागवान, माजी रणजीपटू अन्वर शेख, निकी सलढाना, सतीश पेडणेकर, मिलिंद गुंजाळ, अनिल वाल्हेकर, अनंत धामणे, विश्वास गोरे, सुधीर कुलकर्णी, अरविंद मेहंदळे, सुरेश ढुमके यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर राजकीय क्षेत्रातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भन्साळी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व अंकुश काकडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, बाळासाहेब गांजवे, थिएटर असोसिएशनचे अध्यक्ष कुदळे आदी उपस्थित होते.