
गेल्या आठवडय़ापासून पावसाचा जोर कमी होऊन कडकडीत उन्हाचे चटके बसू लागले असतानाच बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या तुफान पावसाने कोल्हापूर, सातारा आणि सांगलीकरांना चांगलेच झोडपून काढले. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते.
कोल्हापुरात यंदा उंबरठय़ावर आलेल्या पूरस्थितीचे संकट टळल्यानंतर आता दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र, दिवसभर कडकडीत उन्हामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. आज दिवसभरही उन्हाचे चटके बसत असताना, सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक अतिवृष्टीप्रमाणे मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. सुमारे दीड ते दोन तास पडलेल्या या मुसळधार पावसाने, गटारी आणि नाले ओव्हरफ्लो झाले. सखल भागातील रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते.
सातारा शहर व परिसरास दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोरेगाव, खंडाळा, फलटण आदी तालुक्यांतही दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. जुलै महिन्यातील धडाकेबाज बॅटिंगनंतर जिह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणांमधील पाणीसाठा सरासरी 60 टक्क्यांवर असून, नद्या-नालेही अद्याप अपेक्षेप्रमाणे धुवून गेलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱयांसह सर्वांनाच चिंता लागली आहे. यातच गेल्या चार दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा वाढला असून, आज सकाळपासून असह्य उकाडय़ाने लोक हैराण झाले होते. मात्र, दुपारी दोननंतर आकाशात ढग दाटून आल्याने पावसाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर सुमारे तास-दीड तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
आठवडाभर उसंत घेतल्यानंतर सांगली जिह्याच्या बहुतांशी भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावांत रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. जुलैच्या पंधरावडय़ात दमदार पाऊस बरसल्यानंतर गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाचा जोर कमी झाला होता. दमदार पावसानंतर पेरण्यांना गती आली, पेरण्यायोग्य पावसानंतर जिह्यात 90 टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या. शेतीची अन्य कामेही जोमात सुरू होती.























































