
यंदा हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सनी 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे. स्टार महिला खेळाडू मीराबाई चानूने देखील यंदा चांगली कामगिरी केली. 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यामुळे आता मीराबाईचे चाहते फक्त सामान्य लोकच नाहीत तर ‘थॉर’ या हॉलिवूड चित्रपटाचा नायक क्रिस हेम्सवर्थ देखील आता मीराबाईचा चाहता झाला आहे.
थॉरने मीराबाईची स्तुती करण्यासाठी एक ट्विट देखील केले आहे, ज्यामध्ये त्याने मीराबाई यांचे कौतुक केले आहे. आपल्या एका ओळीच्या कॅप्शनमध्ये थॉरने मीराबाईंना आपण महान आहात असे म्हणत अभिनंदन केले आहे. हेम्सवर्थने लिहिले की आपण पदक जिंकण्यासाठी सक्षम आहात. अभिनंदन, मीराबाई, तुम्ही एक दिग्गज आहात.
मीराबाई चानूने इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वेटलिफ्टिंग 49 किलो गटात हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. त्याचवेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा देखील प्रयत्न केला. मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले.
2018 साली मीराबाई चानूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच मीराबाईने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. आता बर्मिंगहॅम मध्ये मीराबाई चानूने चमकदार कामगिरी केल्याने दिग्गजांनी तिची प्रशंसा केली आहे.


























































