हिंदमाता, गांधी मार्केट पूरमुक्त, ‘कोस्टल रोड’ वेगात! आदित्य ठाकरे यांच्याकडून विकासकामांची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आणि पालिकेच्या माध्यमातून भूमिगत टाक्यांच्या प्रयोगामुळे दरवर्षी पाणी तुंबणारा परळ येथील हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसर आता पूरमुक्त झाला आहे. तर मुंबईला वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे कामही वेगात सुरू असल्याचे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विकासकामांच्या पाहणी दौऱयादरम्यान सांगितले. या पाहणी दौऱ्यात इंफिनिटी स्कल्पचर आणि नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचे लोकार्पणही करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता येथील अंडरग्राऊंड वॉटर टँक कामांची पाहणी करताना शिल्लक काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनादेखील प्रशासनाला दिल्या. कोस्टल रोड कामाच्या पाहणीत हाजी अली येथे टनेलमध्ये जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणीही त्यांनी केली. हिंदमाता, गांधी मार्केट या ठिकाणी केलेल्या कामाचा चांगला परिणाम या वर्षीपासूनच दिसायला लागल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. या कामांसाठी शिवसेनेचा पाठपुरावा आणि पालिकाचे कामही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

‘ते’ राजकारण करताहेत आणि आम्ही जनतेची कामे!

राज्यात सध्या ‘सर्कस’ सुरू आहे. ‘ते’ लोक राजकारणात व्यस्त आहेत, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी फुटीरांना लगावला. आमचे लक्ष मुंबई आणि मुंबईकरांच्या सुखसोयींवर आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ‘आरे’बाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर बोलताना सांगितले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही 806 एकर जंगल म्हणून आरेची जागा घोषित केली. ‘आरे’तील केवळ झाडांचा विषय नाही आहे. तिथे 5 ते 6 वाघ आहेत. कांजुरमार्गला आम्ही सगळे डेपो हलवले होते. त्यामुळे 8 ते 9 हजार कोटी वाचले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. चारही लाईनचे एकाच ठिकाणी काम झाले तर जमिनीची किंमत कमी होईल, जनतेचे पैसे वाचवू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.