काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील जनतेने संताप व्यक्त केला होता. आता कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूमुळे हिंदुस्थानचा गौरव वाढला. परदेशातील हिंदुस्थानी आता म्हणतात की मोदींमुळे आम्हाला खूप मान मिळत आहे. मोदी सत्तेत आल्यापासून विदेशात हिंदुस्थानींना मान मिळतोय. मात्र मोदींच्या आधी हिंदुस्थानींना परदेशात मान मिळत नव्हता. असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की आत्मनिर्भर हिंदुस्थान असे बोलणारा पंतप्रधान हिंदुस्थानला लाभला आहे. पंतप्रधान मोदी दिवसातील 20 तास काम करतात. आपल्याला असे नेतृत्व लाभले हे आपले सौभाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे. जगभरातील लोक आज आपला सन्मान करत आहेत. याआधी आपले पंतप्रधान विदेशात जायचे तेव्हा इतर देशांमधील पंतप्रधान आणि राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानाच्या पाठीवर थाप द्यायचे. मात्र आता मोदी विदेशात जाऊन तेथील पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या पाठीवर थाप देतात. कारण आपल्या देशाचा स्वाभिमान जागा झाला आहे.

































































