
>> अस्मिता येंडे
गतकालीन/समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा म्हणजे सूचितार्थाचा हास्यजनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र.
व्यंग्यचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात; तर काही हसवता हसवता अंतर्मुख बनवतात. काही उघड संदेश देणारी असतात. व्यंगचित्र हे चित्र व शब्द यांचे संयुक्त माध्यम आहे.
मराठीमधील व्यंगचित्रकारांची नावे या संदर्भात घ्यायची झाल्यास श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मनोहर सप्रे, ज्ञानेश सोनार, विजय पराडकर, यशवंत सरदेसाई, प्रभाकर वाईरकर, विवेक म्हेत्रे, अभिमन्यू कुलकर्णी, रंगा, प्रभाकर झळके, प्रशांत कुलकर्णी आदींचा उल्लेख करावा लागेल. प्रारंभी दै. ‘सकाळ’मधून व नंतर दै. ‘लोकसत्ता’मधून’ प्रसिद्ध होणारी ‘चिंटू’ (चारुहास पंडित/प्रभाकर वाडेकर) ही चित्रपट्टी आणि राम वाईरकर, प्रताप मुळीक यांच्या ऐतिहासिक-पौराणिक कथांवरील व्यंगपुस्तिका लक्षणीय आहेत. आर. के. लक्ष्मण यांची मूळ इंग्रजीतून काढलेली व्यंगचित्रे दर्जेदार व लोकप्रिय ठरली आहेत. लेखक, प्रकाशक, संपादक, हास्य, व्यंगचित्रकार, उत्तम वत्ते, मोटिवेशनल कोच विवेक मेहेत्रे यांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. गेली 39 वर्षे ते व्यंगचित्र रेखाटत आहेत आणि त्यांचं हे सातत्य कमालीचे आहे. आतापर्यंत आपण व्यंगचित्र हे वर्तमानपत्राच्या पुरवणीमधून पाहत आलोय. या व्यंगचित्रांचा संग्रह म्हणजे ‘हास्यविवेक’. मेहेत्रे यांची कल्पनाशक्ती, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, चौफेर वाचन, विनोदबुद्धी आणि सामाजिक भान, हजरजबाबीपणा या गुणवैशिष्ट्यांमुळे या पुस्तकातील व्यंगचित्रे अधिक प्रभावी ठरली आहेत.
या पुस्तकातील व्यंगचित्रातून मेहेत्रे यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून अनेक राजकीय, सामाजिक विषयांना हात घातला आहे. अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने भाष्य केले आहे. पती- पत्नीमधील प्रसंग विनोदाने फुलवले आहेत. एकंदरीत सामान्यांच्या मनातील भावना, संवेदना टिपून ही व्यंगचित्रे त्यांनी चितारली आहेत. 2018 साली त्यांनी अखिल भारतीय मराठी हास्य-व्यंगचित्र संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्या पुंचल्याच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसवत राहतील,हे नक्की! आजुबाजूला दिसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या संग्रहातून मिळते. पुस्तकाचं शीर्षकही यथोचित आहे. या पुस्तकाला लेखक प्रा. भा. ल. महाबळ यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. खुशखुशीत शब्दरचना, विनोदी शैली आणि हास्यचित्रे यांचा सुरेख संगम म्हणजे ‘हास्यविवेक’ व्यंगचित्रसंग्रह होय.
हास्यविवेक – व्यंगचित्रसंग्रह
व्यंगचित्रकार : विवेक मेहेत्रे
प्रकाशक : उद्वेली बुक्स
मूल्य : रुपये 130/-



























































