
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बलात्कारानंतर मुलींची हत्या केली जाते त्यासाठी अशोक गेहलोत यांनी फाशीच्या शिक्षेला जबाबदार धरले आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर बलात्काऱ्यांना फाशी देण्याचा कायदा तयार करण्यात आला. मात्र त्यामुळे आता बलात्कारानंतर मुलींची हत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशभरात महागाईवरून काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामाजिक विषयांवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. ”मुलींची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याची प्रकार वाढत आहेत. निर्भया बलात्कार कांडानंतर बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाल्यापासून हत्यांचे प्रकार वाढत चालले आहेत. बलात्कार करणारा विचार करतो की जर ही वाचली तर माझ्याविरोधात साक्ष देईल. त्यामुळे तो तिची हत्याच करतो. सध्या हा मोठा ट्रेंड आलाय आपल्या देशात. हा खूप भयंकर आहे.”, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.
त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ झाला असून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ”गेहलोत त्या हत्यांसाठी बलात्काऱ्याला नाही तर कायद्याला जबाबादार धरत आहेत. हे फारच चुकीचं आहे. ते कायम अशी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. सध्या राजस्थान बलात्काराच्या घटनांमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता प्रियंका गांधी शांत का आहेत. त्यांचे नेते असे वादग्रस्त वक्तव्य करतायत त्यावर त्या काही बोलत का नाही’, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद यांनी केली आहे.


























































