
गुजरातमधील वडोदरा येथील पदरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. गुजरात मध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांमधून मगरी बाहेर आल्या असून त्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये व लोकांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पदरा तालुक्यातील सोखदराघु गावातील रहिवाशांनी रविवारी सकाळी एक धडकी भरवणारे दृश्य पाहिले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मगरीने गावातील एका 30 वर्षीय तरुणाला नदीत ओढत नेले. इम्रान दिवान असे या तरुणाचे नाव आहे. इम्रानला अनेकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मगर त्याला तोंडाने ओढत नदीत घेऊन गेली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, पदरा शहरापासून हे गाव 30 किमी अंतरावर आहे. या मगरींना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही मगर आपल्या घरात घुसून कोणालाही ओढत नेऊ शकते, अशी भीती लोकांना आहे. अनेक ठिकाणी या मगरी सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
વડોદરાની ઢાઢર નદીમાં મગરે યુવકનો શિકાર કર્યો
30 વર્ષીય આ યુવાન મગરનો શિકાર બન્યો હતો
નદીમાં બે કલાક ખેલાયો ખૂની ખેલ
સોખડારાઘુ ગામનો યુવક ઢાઢર નદીમાં ગયો હતો#vadodara #viral #gujarat #crocodile pic.twitter.com/t4gNHX7apY— Hiren Patel (@HirenPa307) August 7, 2022
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ही मगर तरुणाला नदीत घेऊन जाताना दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलालाही मदतीसाठी पाचारण केले होते, मात्र अनेक तास चाललेल्या शोध मोहिमेनंतरही तरुणाचा मृतदेह सापडला नाही.
यासंदर्भात इम्रानचा भाऊ जावेदने सांगितले की, “इम्रान हा नदीच्या काठावर असलेल्या दर्ग्यात गेला होता. यावेळी तो दर्ग्याच्या कठड्यावरून घसरून नदीत पडला असावा. मात्र नदीत असणाऱ्या मगरीने त्याला पकडून नदीत ओढत नेले. आम्ही अजूनही त्याच्या मृतदेहाचा शोध घेत आहोत. पावसामुळे नदीत भरपूर पाणी आहे”. मृत इम्रान हा शेतमजूर होता व त्याला पत्नीही आहे.




























































