टायमिंगचा बादशहा हरपला! प्रदीप पटवर्धन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी रंगभूमी, चित्रपट किंवा मालिकांमध्ये आपल्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गिरगाव येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा श्रीतेज असा परिवार आहे. पटवर्धन यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीप पटवर्धन हे  ‘पटय़ा’ या नावाने इंडस्ट्रीत लोकप्रिय होते. ‘मोरूची मावशी’ या नाटकातून पटवर्धन घराघरांत पोचले. या नाटकाने त्यांना विनोदी अभिनेता ही ओळख दिली. हीच ओळख पुढे कायम राहिली. त्यांच्या निधनाने हसतमुख नट हरपला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

1985 साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारांहून अधिक प्रयोग केले होते. ‘लग्नाची बेडी’, ‘भटाला दिली ओसरी’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘कॅरी ऑन पप्पा’, ‘बायांनो नवरे सांभाळा’, ‘लेले विरुद्ध लेले’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘माझी पहिली चोरी’, ‘बायको असून शेजारी’, ‘अशी बायको हवी’ अशा अनेक नाटकांत त्यांनी काम केले. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’, ‘गोळा बेरीज’,  ‘पोलीस लाईन’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला.