हिप्परगा तलाव 90 टक्क्यांवर, सोलापूर शहरातील वस्त्यांना सतर्कतेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा हिप्परगा तलाव एकरूख मध्यम प्रकल्प सध्या 90 टक्क्यांवर भरला असून, सततच्या पावसामुळे येत्या 24 तासांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या तलावाच्या सांडव्यातून पाणी सोडण्याची तयारी केली आहे. दरम्यान, यामुळे शहरातील काही वस्त्यांना व गावांना फटका बसण्याची शक्यता असून, सतर्कतेचे आवाहन केले आहे.

एकरूख मध्यम प्रकल्पात सध्या 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. सतत पडणारा पाऊस व आजूबाजूच्या ओढय़ांतूनही मोठय़ा प्रमाणावर तलावात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येत्या 24 तासांत हा प्रकल्प भरण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने पालिकेला कळविले आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी ओढय़ाद्वारे सोडण्यात येते. हा ओढा शहराच्या पांढरेवस्ती, अवंतीनगर, मडकीवस्ती, वसंतविहार बाळे, देगाव, कवठे, बेलाटीमार्गे जातो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना हानी टाळण्यासाठी दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सोलापूर महापालिकेने केले आहे. कार्यालय क्रमांक 6मध्ये या पार्श्वभूमीवर विशेष पथक नेमण्यात आले आहे.