
>> शब्दांकन : निनाद पाटील
कळत-नकळतपणे वसंता मला बरंच काही शिकवून गेला आणि आजही शिकवतोय. त्याच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती त्या सकारात्मकतेने भरून आणि भारून जाते… मीसुद्धा त्यातलाच एक!…. सांगताहेत अभिनेते मिलिंद गवळी.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या आठवणींच्या अल्बममध्ये शालेय जीवनातल्या आठवणी काही खास असतात. मी शाळेत असताना एक आठवण कधीही न विसरण्याजोगी आहे. मित्रांमध्ये पैज लागली होती. दिवाळीतल्या फटाक्यांमधला सुतळी बॉम्ब शाळेत फोडण्याचा मी विडा उचलला. तोसुद्धा चक्क आमच्या शेट्टीसरांच्या पायाजवळ. मोठय़ा हुशारीने तो बॉम्ब मी फोडला आणि अपेक्षेप्रमाणे पकडला गेलो. त्यानंतर माझी जी शाळा घेतली गेली की विचारता सोय नाही. सरांचा ओरडा तर पुष्कळ बसलाच, पण नंतर मला सरांनी कधी कोणत्याही नृत्याच्या स्पर्धेत घेतलं नाही. (एक गोष्ट तितकीच खरी की मी नंतर त्यांचा लाडका विद्यार्थी झालो.) पण नृत्य या शब्दाबद्दल माझ्या मनाच्या कोपऱयात कळत-नकळतपणे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पुढे ‘काळभैरव’ नावाचा सिनेमा करत असताना एका सीनमध्ये एक वसंत हंकारे नावाची व्यक्ती पुढे आली आणि मला म्हणाली, दादा नुसते काय उभे राहता? दोन चार स्टेप्स करा ना. माझी तयारीच नव्हती. पण वसंतने पहिला धडा मला दिला तो असा, ‘हे बघा दादा कोणतीही गोष्ट मला येत नाही. मला जमणार नाही असं कधीही केव्हाही म्हणायचं नाही. मी तुम्हाला शिकवतो,’ असं म्हणत त्याने दोन-चार सोप्या स्टेप्स मला शिकवल्याही आणि माझ्या मनाच्या कोपऱयातलं लहानपणापासून असलेलं प्रश्नचिन्ह माझ्या नकळत पुसलं गेलं ते आजतागायत. त्या क्षणापासून वसंताशी माझं मैत्र जुळलं ते कायमचं. गाईच्या गोठय़ात त्यांनी शिकवलेल्या त्या नृत्याच्या स्टेप्स, छान जमिनीवर बैठक मारून खाल्लेली पिठलं-भाकरी… सगळं काही आजही लक्षात आहे माझ्या.
आज हाच वसंत हंकारे मोटिवेशनल स्पीकर म्हणून नावारूपाला आला आहे. तो नृत्यविशारदही आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांसाठी शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून वसंत हंकारे यांची वर्कशॉप्स शासनाने समाविष्ट केली आहेत. वसंत म्हणतो की प्रत्येक शिक्षकाला अभिनय येणं फार गरजेचं आहे. जो शिक्षक वीर रसात पूर्ण इतिहास शिकवतो तो इतिहास विद्यार्थी कधीच विसरू शकत नाही. एक वेळ मुलाला ‘वॉटर’ या शब्दाचं स्पेलिंग आलं नाही तरी चालेल, पण समोरच्या तहानलेल्या व्यक्तीची तहान भागवता आली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर, इंजिनीयर बनवा किंवा आणखी काही. प्रोफेशन कोणतंही असो पण त्या आधी त्याला एक चांगलं माणूस बनवणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का तो चांगला माणूस बनला की त्यानंतर कोणताही व्यवसाय तो तन्मयतेने आणि यशस्वीपणे करेल हे निश्चित.
आपण समाजाचं काही देणं लागतो, अशा विचाराने प्रेरित होऊन मी वसंत सोबत दिल्लीच्या प्लॅन इंडिया ट्रस्टसाठी एक कार्यक्रम केला होता. विशेष सांगायचा मुद्दा असा की ती मुलं प्रतिष्ठत घरातली नसून रस्त्यावर राहणारी, डोक्यावर छत नसलेली, काहींचा आई-वडिलांचाही पत्ता नव्हता तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेली. अशा मुलांसाठी तो कार्यक्रम खास बनवला गेला होता. सांगायला अभिमान आणि आनंद दोन्ही वाटतो कारण त्यातली कित्येक मुलं आज मेहनत करून घामाचा पैसा कमवत आहेत. आम्ही केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद मला शब्दात मांडता येत नाही.
वसंताला जग बदलायचं आहे तेही जमेल तसं, झेपेल तसं. संपूर्ण जग त्याला सकारात्मक करून सोडायचं आहे. तो म्हणतो की चेहरा सतत हसरा हवा. आत कितीही ढवळून निघत असला तरी चेहरा प्रसन्न हवा. स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. जीवनावर प्रेम करता आलं पाहिजे. आयुष्यात योग्य वेळी, योग्य निणर्य घेता आले पाहिजेत. आणि त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारीसुद्धा घेता आलीच पाहिजे. मेहनत करून घाम गाळता आला पाहिजे. क्षणोक्षणी संघर्ष करता आला पाहिजे आणि संघर्षातून मिळणारे अपयशसुद्धा सोन्यासारखे असते हे विसरता कामा नये. वसंताकडून शिकलेल्या अशा अनेक गोष्टींतून मला कायम प्रेरणा मिळत आली आहे.



























































