
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
गेल्या काही वर्षात ‘इसिस’ला जाऊन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच जणांना अटकही करण्यात आली आहे. ‘अल कायदा’ ही दहशतवादी संघटना आपण निष्प्रभ केली, तरीही त्यांची तत्त्वे पाळणाऱ्या आणि वाढणाऱ्या संघटना आहेत. त्यामुळे अल् जवाहिरीला ठार मारून ‘अल कायदा’ संपली असे गृहित धरणे चुकीचे ठरेल. विशेषतः कश्मीरची मुक्ती करणे हा मुद्दा ‘अल कायदा’ला हिंदुस्थानात दहशतवाद घडवायला सक्रिय करतो.
अल कायदाचा नेता अमीर अयमान अल् जवाहिरीला अमेरिकेच्या ड्रोननं ठार केलं. अमेरिकेजवळ दहशतवादी अचूक मारण्याची क्षमता आहे. त्यामुळं अल् जवाहिरीला अचूक टिपलं. अयमान जवाहिरी हा इजिप्शियन डॉक्टर, ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या इजिप्शियन संघटनेचा दहशतवादी होता. इजिप्तमधलं सरकार उग्रवादी इस्लामी असावं, या विचारानं ब्रदरहूड काम करीत होती. प्रेसिडेंट सादत यांना मारण्यात जवाहिरीचा हात होता. मग त्याला देश सोडून पळावं लागलं. त्याची बिन लादेनची गाठ पडली, नंतर तो अल कायदाचा ‘नंबर दोन’ झाला.
11 सप्टेंबर 2001चा अमेरिकेवरचा हल्ला घडवण्यात जवाहिरीचा सहभाग होता. बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरी काबूलमधे लपला. पाक-अफगाण हद्दीवरच्या हक्कानी नेटवर्क या दहशतवादी व उग्रवादी गटाने त्याला आसरा दिला. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान व आयएसआयचे समर्थन आहे. त्यांची शेकडो मशीद संकुलं आहेत. एक हक्कानी तालिबानी मंत्रिमंडळात आहे. अल् जवाहिरी संपला तरी हक्कानी नेटवर्क मजबूत आहे. जवाहिरी संपला म्हणजे अल् कायदा संपलं नाही.
अमेरिकेनं या हल्ल्यासाठी ड्रोननं डागल्या जाणाऱ्या हेलफायर क्षेपणास्त्राचा वापर केला. हेलफायर हे एक हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र असून अमेरिकेच्या परदेशातील दहशतवादविरोधी मोहिमांचा ते महत्त्वाचा भाग बनलं आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर, जमिनीवरची वाहनं, जहाजं, काही लढाऊ विमानं आणि ड्रोन मानवविरहीत वाहनातूनही डागता येतं. 2020 साली अमेरिकेनं इराणचे लष्करप्रमुख कासेम सुलेमानी यांना बगदादमध्ये मारण्यासाठी हेलफायर क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. 2015 साली सीरियामध्ये ’जिहादी जॉन’ नावानं ओळखला जाणारा इस्लामिक स्टेट संघटनेचा ब्रिटिश जिहादी अतिरेकी याच हेलफायरने मारला गेला. दहशतवादी मोहिमांसाठी हेलफायरचा वापर करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या क्षेपणास्त्राची अचूकता आहे.
ड्रोनमधून जेव्हा एखादं मिसाईल लाँच करतात तेव्हा एक मिसाईल चालवणारा पायलट ते नियंत्रित करतो. हा पायलट हजारो मैल दूर कंट्रोल रूममध्ये बसून हे काम करत असतो. त्या पायलटला ड्रोनचा कॅमेरा सेन्सर्स आणि सॅटेलाईटद्वारा नियोजित लक्ष्याचा व्हिडीओ फीड सतत पाहता येतो. पायलटला क्रीनवर ’टार्गेटिंग ब्रॅकेट’ दिसत असते, ज्याचा वापर करून पायलट लक्ष्य निश्चित करू शकतो आणि त्यावर एक लेसर सोडतो. एकदा क्षेपणास्त्र्ा डागलं,की ते त्या लेसरचा मागोवा घेत लक्ष्यावर जाऊन धडकतं. या वेगवान मिसाईलमध्ये टार्गेटला ठार करण्यासाठी धारदार ब्लेड्स असतात. त्यामुळे एकटय़ा टार्गेटला गाठणे शक्य होते. आजूबाजूला कमी नुकसान होते. यात अतिरिक्त जीवितहानी टाळली जाते.
अल् शबाब, आयएस, अल कायदा, खोरासान गट, पाकिस्तानी तालिबान, हक्कानी नेटवर्क असे दहशतवादी जिहादी गट अजूनही शिल्लक आहेत. अशा गटांना आपल्या देशात पसरायला वाव मिळणार नाही, याची खबरदारी अमेरिका व युरोपातले देश घेतात. आपापल्या देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक पक्की करण्याकडं आता हे देश लक्ष देत आहेत. जवाहिरी आणि त्याचा जिहादी गट अमेरिका किंवा युरोपीय देशांना त्रास देऊ शकत नव्हता. त्याला मारण्यातून अमेरिकेचा फार फायदा होणार नाही. 11 सप्टेंबर 2001ला जबाबदार असलेल्या एका दहशतवाद्याचा खातमा केला, त्याला मारणे प्रतीकात्मक आहे.
आज जागतिक पातळीवर अल् कायदाचा फ़ारसा प्रभाव नाही. पण जगात जागोजाग जिहादी गट तयार झाले. ते स्थानिकच आहेत, मात्र त्यांना प्रेरणा अल कायदाकडून मिळते. सुदानमधे अल् शबाब, पाकिस्तान व अफगाणिस्तानात अल् आयएस, इराक, सीरियात आयएस, अल् कायदा अफगाणिस्तानात आहे. अल् कायदाचा नंबर दोन शिया देश इराणमध्ये आहे. इराणने अल् कायदा या सुन्नी शाखेला आपल्याकडं आश्रय दिला आहे. प्रसंगी त्यांचा उपयोग होऊ शकतो, असा विचार आहे. आता जवाहिरी नसल्याचा जिहादी संघटनांवर काय परिणाम होईल? फ़ारसा नाही; कारण या संघटनांवर जवाहिरीचं नियंत्रण नव्हतं. आज जिहाद स्थानिक झाला आहे. जगातली सरकारं इस्लामी असावीत, जिहादी विचारांची असावीत असे अनेकांना वाटते. जिहादी चळवळी या राजकीय चळवळी झाल्या आहेत.
सप्टेंबर 2014 मध्ये जवाहिरीने हिंदुस्थानच्या विरोधात जिहाद करावा, असा फतवा काढला होता. अल जिहाद फिशीभी अल करात अल हिंदिया’ किंवा ‘हिंदुस्थानी उपखंडातील अल कायदा’ असे नाव या विंगचे होते. पण त्यांना हिंदुस्थानी सैन्याने लगेच मारले. जेव्हा सप्टेंबर 2021 मध्ये तालिबान पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आले तेव्हा त्यांचे अभिनंदन करून ‘अल कायदा’ने म्हटले होते, ‘इस्लामच्या शत्रूच्या हातातून कश्मीर मुक्त करावा.‘9/11’ च्या हल्ल्यात हे एक कारण लादेनने दिलेले होते. गेल्या काही वर्षात ‘इसिस’ला जाऊन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच जणांना अटकही करण्यात आली आहे. ‘अल कायदा’चे ही दहशतवादी संघटना आपण निष्प्रभ केली, तरीही त्यांची तत्त्वे पाळणाऱ्या आणि वाढणाऱ्या संघटना आहेत. त्यामुळे अल जवाहिरीला ठार मारून ‘अल कायदा’ संपली असे गृहित धरणे चुकीचे ठरेल.





























































