
>> स्पायडरमॅन
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती एका अनोख्या आणि तरंगत्या शहराची, अर्थात फ्लोटिंग सिटीची. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आता एवढी मजल मारली आहे की, चक्क पाण्यावर तरंगणारे एक संपूर्ण शहर वसवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांच्या अत्यंत लाडक्या देशांपैकी एक असलेल्या मालदीव शहरामध्ये हे अनोखे शहर आकार घेणार आहे. जगातील पहिले असे हे तरंगते शहर तयार करण्यासाठी मालदीव सरकार आणि डच डॉकलँड्स यांच्यात नुकताच एक करार करण्यात आला आहे. जमिनीवर उभारण्यात आलेल्या शहरांमध्ये असलेली प्रत्येक सुविधा या पाण्यावर तरंगत्या शहरातदेखील असणार आहे. 500 एकर पसरलेल्या समुद्राच्या क्षेत्रामध्ये हे तरंगते शहर उभे केले जाणार आहे. या शहरामध्ये लोक सर्व आधुनिक सुविधांच्या जोडीलाच नैसर्गिक जीवनशैलीचादेखील आनंद घेऊ शकतील अशा विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मालदीवमध्ये उभ्या करण्यात येत असलेल्या या भव्य प्रकल्पात पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. घरांच्या जोडीलाच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स, थिएटर्स, दुकाने यांचेदेखील बांधकाम केले जाणार आहे. ही घरे कमी उंचीची आणि समुद्राकडे तोंड करून बांधली जाणार आहेत. पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध असलेल्या मालदीवच्या राजधानी ’माले’मधून सहजपणे या तरंगत्या शहरापर्यंत जाता येणार आहे. या तरंगत्या शहरात पोहोचण्याची पर्यटकांना ’माले’पासून अवघा 15 मिनिटांचा बोटीचा प्रवास करावा लागणार आहे. या फ्लोटिंग सिटीपासून मालेचे विमानतळदेखील अगदी जवळ आहे. 2023 मध्ये या शहराच्या बांधकामाला सुरुवात होईल आणि पुढील चार ते पाच वर्षांत त्याचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. इतर देशातील लोकदेखील इथे घर खरेदी करू शकतील आणि निवासी परवाना मिळवू शकतील हे विशेष!




























































