पश्चिमरंग – विवाल्डीचे ‘फोर सीझन्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील 

पाश्चात्य अभिजात संगीतातल्या सर्वात लोकप्रिय रचनांची यादी बनवण्याचं काम आजपर्यंत बऱयाच जणांनी स्वतंत्ररीत्या केलंय. या सर्वांच्या याद्यांमध्ये न चुकता येणारी एक संगीतरचना म्हणजे विवाल्डीचे ‘फोर सीझन्स’! अक्षरशः शेकडो वेळा जागतिक कीर्तीच्या व्हायोलिनवादकांनी त्याचं रेकार्ंडग केलं आहे. हॉलीवूडमधल्या कित्येक चित्रपटांत, टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये यातलं संगीत वापरलं गेलं आहे.

पाश्चात्य अभिजात संगीतातल्या सर्वात लोकप्रिय रचनांची यादी बनवण्याचं काम आजपर्यंत बऱयाच जणांनी स्वतंत्ररीत्या केलंय. या सर्वांच्या याद्यांमध्ये न चुकता येणारी एक संगीतरचना म्हणजे विवाल्डीचे ‘फोर सीझन्स’! अक्षरशः शेकडो वेळा जागतिक कीर्तीच्या व्हायोलिनवादकांनी त्याचं रेकार्ंडग केलं आहे. हॉलीवूडमधल्या कित्येक चित्रपटांत, टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये यातलं संगीत वापरलं गेलं आहे. पाश्चात्य जगात शॉपिंग मॉलमध्ये, लिफ्टमध्ये, मोबाईलच्या रिंगटोनमध्येही यातलं संगीत बऱयाचदा ऐकायला मिळतं!

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात बरोक कालखंडातल्या संगीतात आपली छाप पाडणारा विवाल्डी हा इटालियन संगीतकार होता. इटलीमधल्या व्हेनिस इथं त्याचं वास्तव्य असायचं. केसांचा रंग लाल असल्यानं (आणि धर्मगुरू असल्यानं) तो ‘लाल धर्मगुरू’ या नावानं त्या काळात ओळखला जायचा. व्हेनिसमधल्या मुलींसाठी असणाऱया एका अनाथाश्रमात तो संगीत शिकवायचा. विवाल्डीसारखा प्रतिभावान संगीतकार शिकवायला असल्यानं या अनाथाश्रमातल्या मुलींनी सादर केलेलं संगीत उत्कृष्ट दर्जाचं असणं स्वाभाविक होतं.

विवाल्डीनं आपल्या आयुष्यभरात शेकडो कंचेर्टो रचल्या. कंचेर्टो म्हणजे बऱयाचशा वादकांनी मिळून वाजवण्याच्या विशिष्ट प्रकारच्या रचना. यात सहसा वादकांचे दोन गट असायचे. एक छोटा गट आणि एक मोठा गट. संगीतातली एखादी थीम घेऊन त्यात बदल करत हे गट आळीपाळीनं वाजवत जायचे. काही वेळेला छोटा गट म्हणजे फक्त एकच वादक असायचा. अशा वेळी मोठा गट म्हणजे उरलेला सारा वाद्यवृंद असायचा. अशा कंचेर्टो ‘सोलो कंचेर्टो’ नावानं ओळखल्या जायच्या. विवाल्डीनं रचलेल्या कंचेर्टोपैकी बऱयाचशा कंचेर्टो या व्हायोलीनसाठी रचलेल्या सोलो कंचेर्टो आहेत. याचं कारण म्हणजे विवाल्डी हा स्वतः एक उत्कृष्ट व्हायोलिनवादक होता.

‘फोर सीझन्स’मध्ये विवाल्डीनं रचलेल्या व्हायोलिनसाठीच्या चार सोलो कंचेर्टो आहेत. प्रत्येक कंचेर्टोमध्ये 3 रचना आहेत. या रचनांना कंचेर्टोच्या 3 मुव्हमेंट्स म्हणतात. यातल्या पहिल्या मुव्हमेंट जलद लयीच्या, दुसऱया मुव्हमेंट संथ लयीच्या तर तिसऱया मुव्हमेंट पुन्हा जलद लयीच्या आहेत.

विवाल्डीनं या चार कंचेर्टो चार ऋतूंपासून (वसंत, ग्रीष्म, पानगळीचा ऋतू आणि शिशिर ऋतू) प्रेरणा घेऊन केलेल्या होत्या. या संगीतरचना छापताना विवाल्डीनं सोबत चार काव्यंही छापली होती. सॉनेट प्रकारातली ही चार काव्यं विवाल्डीनं स्वतः रचली होती, असं बहुतेक जणांना वाटतं. प्रत्यक्ष जीवनातल्या एखाद्या गोष्टीवर संगीत रचणं आणि संगीत छापताना त्या गोष्टीचं काव्यही सोबत छापणं ही काळाच्या पुढची गोष्ट होती. पुढच्या शतकात या प्रकारचं संगीत लोकप्रिय होणार होतं.

वसंत ऋतूच्या कंचेर्टोमध्ये वृक्षांच्या पानांचा हळुवार आवाज, पक्ष्यांचं मधुर गायन, मेंढपाळांच्या कुत्र्यांचं पुन्हा पुनः भुंकणं अनुभवायला मिळतं. या कंचेर्टोच्या शेवटच्या मुव्हमेंटमध्ये शेतकऱयांचं उत्सव साजरं करणं, बॅगपाईप वाद्यांचं वादन यांचा अनुभव मिळतो. त्रासदायक शिशिरानंतर फुलू लागलेल्या सृष्टीचं आनंदानं स्वागत करणाऱया लोकांचं नृत्य या कंचेर्टोच्या शेवटी अनुभवायला येतं. ग्रीष्माच्या कंचेर्टोमध्ये असह्य उष्मा आणि वादळ असल्याच्या भावना संगीतात जाणवतात. शिशिराच्या पहिल्या मुव्हमेंटमध्ये कुडकुडणारी माणसं तालामध्ये पाय आपटत उब मिळवायचा प्रयत्न करताना अनुभवायला मिळतात.

आज जवळपास 300 वर्षं लोटून गेली असली तरी या रचनांची लोकप्रियता जराही कमी झाल्यासारखं वाटत नाही!

[email protected]