
पाटोदा शहरापासून अवघ्या काही कि.मी.वर असलेल्या पाटोदा-मांजरसुंबा या महामार्गावर आज रविवारी सकाळी स्विफ्ट कार आणि आयशर या दोन वाहनांचा भरधाव वेगात समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. स्विफ्टमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रहिवासी असलेले रामराव कुटे हे सलग सुटी असल्याने पुणे येथे आपल्या मुलीला घेऊन आणण्यासाठी गेले होते. मुलीला घेऊन परतत असताना पाटोदा शहराजवळील पाटोदा-मांजरसुंबा या मार्गावर बामदळे वस्तीजवळ कुटे यांच्या स्विफ्ट कारला आयशर टेम्पोचा समोरासमोर अपघात झाला. वेगाने असलेली दोन वाहने समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट गाडी आयशरमध्ये घुसली. या भीषण अपघातमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात रामहरी चिंतामण कुटे (40), सुनीता रामहरी कुटे (35), ऋषिकेश रामहरी कुटे (19), आकाश रामहरी कुटे (15), प्रियंका रामहरी कुटे (17), राधिका सुग्रीव केदार (11) यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत भीषण अपघातामध्ये मृतदेह छिन्नविछिन्न झाले. क्रेनच्या साहाय्याने स्विफ्ट आणि आयशर वेगळे करण्यात आले. स्विफ्टमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. कोणता मृतदेह कोणाचा हे ओळखणेदेखील कठीण झाले होते.




























































