प्रत्येकाने कर्तव्याचे पालन केल्यास देश नव्या उंचीवर, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या दृष्टीने देशाचा प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून घेत त्याचे पालन केल्यास देश नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला देशाला संबोधित करताना व्यक्त केला.

जगभरातील अनेक लोकशाही देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी कित्येक वर्षे प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आपल्या देशात सुरुवातीपासूनच महिलांना हा अधिकार मिळाला आहे ही बाब गौरवास्पद आहे. समान अधिकार मिळाल्यानेच महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच आदिवासी समाजाने देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पष्ट केले. देशाला मुलींकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. संधी मिळताच त्या मोठे यश संपादन करत आहेत. त्यामुळेच त्या सध्या फायटर पायलटपासून अंतराळ संशोधक म्हणून काम करताना दिसत आहेत. देशाच्या नव्या आत्मविश्वासाचा स्रोत युवा पिढी, शेतकरी आणि महिला आहेत. महिला प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जाताना दिसत आहेत ही अभिमानाची बाब आहे. आज देशाच्या पंचायत राज व्यवस्थेत तब्बल 14 लाख महिला प्रतिनिधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था वाढतेय
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग बेहाल झाले होते, तेव्हा हिंदुस्थानने त्याचा समर्थपणे सामना केला. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सावरली असून आता वेगाने वाढत आहे. आम्ही जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले असल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले.