
1984 मध्ये सियाचीनच्या मुद्दय़ावरून हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात प्राणांची आहुती देणारे शहीद लान्स नायक चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव तब्बल 38 वर्षांनी त्यांच्या घरी पोहोचणार आहे. 29 मे 1984 रोजी ऑपरेशन मेघदूत वेळी आलेल्या हिमवादळात चंद्रशेखर यांना वीरमरण आले. ते 19 कुमाऊ रेजिमेंटचे सैनिक होते. वादळात ते बेपत्ता झाले होते तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता.
सियाचीनमध्ये 16 हजार फुटांहून अधिक उंचीवर एका सैनिकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह चंद्रशेखर यांचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी चंद्रशेखर यांचा मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. उद्या मंगळवारी त्यांचे पार्थिव उत्तराखंड येथील हद्वानी येथे नेण्यात येणार असून तेथे लष्करी इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
16 हजार फूट उंचीवर ऑपरेशन मेघदूत
1984 मध्ये सियाचीनच्या मुद्दय़ावरून हिंदुस्थान-पाकमध्ये युद्ध झाले. हिंदुस्थानी लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीन ग्लेशिअरवर ऑपरेशन मेघदूत लाँच केले. त्यात प्वॉइंट 5965 वर चंद्रशेखर यांच्या पथकाला पाठवण्यात आले, पण हिमवादळात अडकल्यामुळे त्यांचे 19 सदस्यीय गस्ती पथक बेपत्ता झाले. यातील 14 जणांचे मृतदेह आढळले, तर 5 जण अद्याप बेपत्ता होते.
वयाच्या 28 व्या वर्षी वीरमरण
29 मे 1984 रोजी सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूत वेळी हिमवादळ आले होते. चंद्रशेखर या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. ते शहीद झाले त्यावेळी त्यांची मोठी मुलगी 8, तर छोटी मुलगी 4 वर्षांची होती. आता त्यांच्या पत्नीचे वय 65 वर्षे झाले आहे, पण त्यांना अजूनही आपले पती एकदिवस निश्चितच घरी येतील असा विश्वास होता. उत्तराखंडच्या अल्मोडातील द्वाराहाटचे हाथीगूर बिंटा येथील चंद्रशेखर त्यावेळी 28 वर्षांचे होते. ते 15 डिसेंबर 1971 रोजी लष्करात भरती झाले.
बर्फात दबलेल्या मृतदेहाजवळ आढळला डिस्क क्रमांक
काही दिवसांपासून सियाचीन ग्लेशिअरमध्ये मोठय़ा प्रमाणावर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेपत्ता जवानांचा शोध सुरू करण्यात आला. यादरम्यान 13 ऑगस्ट रोजी लान्स नायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह एका जुन्या बंकरशेजारी सापडला. त्यांच्या मृतदेहाची ओळख लष्कराच्या डिस्क क्रमांकावरून झाली. हा क्रमांक त्यांना सैन्य दलातून मिळाला होता. त्यांच्या डिस्कवर 4164584 हा क्रमांक लिहिला होता.
























































