एकाच वेळी 19 नाशिककर ‘आयर्नमॅन’चे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कझाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या अत्यंत खडतर अशा ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत नाशिककरांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सहभागी सर्वच 19 नाशिककरांनी प्रचंड वेगाने वाहणाऱया वाऱयाला तोंड देत ही स्पर्धा निर्धारित वेळेआधी पूर्ण करीत ‘आयर्नमॅन’ किताब जिंकला. विशेष म्हणजे प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि डॉ. अरुण गचाले यांनी सलग तिसऱयांदा, तर डॉ. गचाले यांनी त्यांच्या 17 वर्षीय मुलासह ही स्पर्धा पूर्ण करीत विक्रम केला आहे.

कझाकिस्तान येथे आयोजित ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत जगभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे स्वरूप 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे असे होते. वाऱयाचा वेग जास्त असल्याने सायकलिंग आव्हानात्मक ठरले. नाशिकच्या डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाले, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झंवर, प्रशांत डबरी, अश्विनी देवरे, नीलेश झंवर, नीता नारंग, आविष्कार गचाले, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरीया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार यांनी सहभाग नोंदवला आणि निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ किताबही पटकावला. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर हिंदुस्थानी दूतावासाने त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा मान दिला.

ट्रायथलॉन अकादमी सुरू करणार

नाशिककर महेंद्र छोरीया, डॉ. अरुण गचाले आणि प्रशांत डबरी यांनी स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक केली. लवकरच नाशिकमध्ये आम्ही ट्रायथलॉन अकादमी सुरू करणार आहोत. ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱया खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे, असे महेंद्र छोरीया यांनी सांगितले. अल्ट्रामॅन स्पर्धा हे पुढील लक्ष्य असून त्या दृष्टीने तयारीला लागलो आहे, असेही ते म्हणाले.

पिता-पुत्राचा विक्रम

नाशिकचे डॉ. अरुण गचाले व त्यांचा 17 वर्षीय मुलगा आविष्कार यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. डॉ. गचाले यांनी सलग तिसऱयांदा स्पर्धा पूर्ण केली असून यंदा मुलासह हे यश मिळवले. ‘आयर्नमॅन’सारखी अवघड स्पर्धा पूर्ण करणारे हे पहिलेच पिता-पुत्र ठरले आहेत.