आले रे आले… गद्दार आले! महाराष्ट्राशी गद्दारी, आली शिंदेंची स्वारी; पावसाळी अधिवेशनातील घोषणांपुढे फुटीरांची दाणादाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आले रे आले… गद्दार आले’, ‘महाराष्ट्राशी गद्दारी, आली शिंदेची स्वारी’, ‘आले रे आले पन्नास खोके आले…’ ‘50 खोके एकदम ओक्के’ ‘ईडी सरकार हाय हाय…’, ‘स्थगिती सरकार हाय हाय…’, ‘या सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय’, ‘ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा’ अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. विरोधकांच्या तुफान घोषणाबाजीपुढे फुटीरांची बोलती बंद झाली. विरोधकांच्या गर्दीतून शिंदे अणि त्यांच्या समर्थक आमदारांनी कसाबसा काढता पाय घेत आपली सुटका करून घेतली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सत्तारूढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील पायऱयांवर ‘ईडी’ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणांचा दणदणाट व आक्रमकतेपुढे हतबल झालेलेल्या शिंदे गटातील फुटीर आमदारांवर अक्षरशः मान खाली घालून काढता पाय घेण्याची वेळ आली.

महाविकास आघाडीचे आमदार विधान भवनाच्या पायऱयांवर हातात फलक घेऊन उभे होते. ‘राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा’ अशा घोषणा देत फलक उंचावत होते. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘स्थगिती सरकार हाय हाय’ अशा घोषणा सुरू होत्या. शिवसेनेशी गद्दारी करून भाजपसोबत गेलेले बंडखोर आमदार येताच महाविकास आघाडीच्या आमदारांचा आवाज अधिकच चढत होता. बंडखोर आमदार येताच ‘आले रे आले 50 खोके आले…’, ‘आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणांनी विधानसभेचा परिसर दणाणून गेला.

नव्या सरकारमधील मंत्री खातेवाटपावरून नाराज आहेत. त्यावरूनही महाविकास आघाडीच्या आमदारांनी निशाणा साधला. सुधीर मुनगंटीवार येताच ‘सुधीरभाऊंना चांगले खाते न देणाऱया सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या, तर आशीष शेलार पायऱयांवर येताच ‘शेलारांवर अन्याय करणाऱया सरकारचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

एकनाथ शिंदे आणि गद्दारीच्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच महाविकास आघाडीच्या आमदारांचा आवाज टिपेला पोहोचला. ‘महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेंची स्वारी’, ‘आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. पोलिसांनी पायऱयांवरून मुख्यमंत्र्यांना कशीबशी वाट करून दिली. त्यानंतर त्यांनी विधान भवनात प्रवेश केला.

तुम्हाला पाहिजे का पन्नास खोके? शंभुराज देसाई यांच्या वक्तव्याने नेटकरी संतापले

मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदारांसह विधान भवनातून बाहेर पडतानाही विरोधकांनी 50 खोके एकदम ओक्के अशा घोषणा दिल्या. त्यावर शिंदे यांनी अरे त्यांना पाहीजे का? विचारा असा इशारा करताच मंत्री शंभुराजे देसाई यांनी तुम्हाला पाहिजे का पन्नास खोके, अशी खुली ऑफरच विरोधकांना दिली. भरतशेठ गोगावले यांनीदेखील खोके आले खोके आले असा सूर आळवला. यावरून नेटकरी चांगलेच संतापले असून असून गद्दारांनी 50 कोटी घेतल्याची कबुलीच दिल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.