
शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाईच्या दाभाडे वस्तीवर (माळीमळा रोड) बिबट्याची दहशत कायम असून आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान निलेश दाभाडे यांचे वडील बाबुराव हे घरासमोरील उसाच्या शेतानजीक शेळ्या चरायला घेऊन गेले होते. दरम्यान उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने थेट बोकडावरच हल्ला केला व बोकड उसाच्या शेतात ओढत नेले. बाबुराव यांनी धाडसाने बिबट्याचा पाठलाग करीत बोकडाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. पण तोपर्यंत बोकड ठार झाला होता.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनकर्मचारी हनुमंत कारकूड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळणार असल्याचे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले. तर नागरिकांनी आपल्या पशुधनाचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याकामी खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी गणेश पवार,वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी केले आहे. दरम्यान परिसरात दोन बिबटे प्रत्यक्ष पाहिल्याचे शेतकरी बाबुराव दाभाडे यांनी सांगितले. यांनी सांगितले.
































































