स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 24 वर; सातारकरांना टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे. स्वाईनचे आणखी 4 रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या 24 वर पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

जिह्यात आतापर्यंत स्वाईनचे 24 रुग्ण आढळले असून, त्यातील 20 रुग्ण गत आठ दिवसांतच आढळले आहेत. आतापर्यंत जावली 2, कराड 5, खंडाळा 1, खटाव 2, कोरेगाव 1, महाबळेश्वर 1, पाटण 2, सातारा 7, वाई 1 व इतर 2 असे स्वाईनचे रुग्ण आढळले आहेत. स्वाईनचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे व वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामधून 9 रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. रुग्णांनी गर्दीमध्ये जाणे टाळावे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरावा. हात स्वच्छ धुवावेत. प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.