तुमको खतम कर देंगे! समीर वानखेडे यांना धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळाल्याचे कळते आहे. अमन नावाच्या ट्विटर हँडलवरून समीर वानखेडे यांना एक मेसेज आला आहे. 14 ऑगस्टला आलेल्या या मेसेजमध्ये म्हटलंय की, ‘तुमको पता है तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा’ (तुला माहिती आहे की तू काय केलं आहेस, याचा हिशोब तुला चुकवावा लागेल). वानखेडे यांना आलेल्या दुसऱ्या एका मेसेजमध्ये म्हटलंय की ‘तुमको खतम कर देंगे ‘ (तुला खलास करू). हे मेसेज मिळाल्यानंतर वानखेडे यांनी गोरेगांव पोलीस ठाण्यात धाव घेतली असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या अकाऊंटवरून वानखेडे यांना धमकी आली आहे, त्या अकाऊंटला एकही फॉलोअर नसून वानखेडे यांना धमकावण्यासाठीच हे अकाऊंट तयार केले असावे असा संशय आहे.

समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक होते. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली होती. या क्रूझवरून अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ही छापेमारी ही बोगस असल्याचा आरोप माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या व्यतिरिक्त मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अन्यही गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते, ज्यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र तयार केल्याच्या आरोपाचाही समावेश होता. या आरोपांमुळे वानखेडे यांची बदली करण्यात आली होती.