
देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात बी.कॉमचे शिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने शालच्या साहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पानी भावनिक सुसाईड नोट जप्त केली असून विद्यार्थिनीने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील आरती सर्जेराव कोल्हे (20) ही देवगिरी महाविद्यालयात बी. कॉमच्या प्रथम वर्षात शिकत होती. महाविद्यालया जवळ असलेल्या वस्तीगृहात चार मैत्रिणीसह राहत होती. दुपारी तिच्या मैत्रिणी बाहेर गेल्या होत्या. आरती ही एकटीच खोलीत असताना तिने शालीच्या साहाय्याने गळफास घेतला. पाच वाजेच्या सुमारास तिच्या मैत्रिणी जेव्हा पुन्हा खोलीवर आल्या तेव्हा त्यांना आरती लटकलेली दिसली.
घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरती हिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात तिने जीवन कसे जगावे अशी भावनिक साद घातल्याचा उल्लेख असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले. मात्र आरतीने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.





























































