
शाळेत किंवा घरगुती कार्यक्रमात कधीच कोणी तिच्या नृत्याची दखल घेतली नव्हती, पण पंधराव्या वर्षी रती वर्माला तिची आई मुंबईतील श्यामक दावर अकादमीमध्ये घेऊन गेली आणि हे चित्र कायमचं पालटलं. या अकादमीमध्ये तिच्या उपजत गुणांची पारख झाली आणि तिथून तिची नृत्यांगना म्हणून वाटचाल सुरू झाली. तिने तिथे दहा वर्षे कंटेम्पररी आणि जॅझ नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. 2006 मध्ये प्रतिभेच्या जोरावर तिला ऑस्ट्रेलिया इथे संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत सादरीकरणाची संधी मिळाली.
खरं तर करीअर म्हणून रतीने नोकरी मिळेल असे काहीतरी निवडावे अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. रतीने त्यांचा मान राखून फाईन आर्टचं शिक्षण घेतलं. पण त्याचवेळी नृत्याकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही.
रती वर्मा म्हणाली, ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी करत असतानाच 29 व्या वर्षी अपघात झाला आणि माझ्या हाताला इजा झाली. तेव्हा मला डिझायनिंगपेक्षा नृत्य सोडावे लागेल का, ही भीती जास्त जाणवली आणि तिथेच मी माझे आयुष्य नृत्यालाच समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
ती पुढे म्हणाली, मी जिद्दीने पेटून उठले आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कला पोहोचले. तिथल्या पेरिडान्स सेंटरमध्ये माझं कंटेम्पररी आणि हॉर्टन नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण सुरू झालं. त्यासोबतच मी तिथल्या लहान मुलांच्या नृत्यवर्गांसाठी सहायकाचंही काम सांभाळलं. तीन वर्षांच्या परिश्रमांनंतर याच अकादमीतून मी ऑनर्सने पदवीधर झाले.
सप्टेंबर 2021 मध्ये रतीला लिंकन सेंटरसमोरील दांते पार्क इथे ‘दांते’ या ऑपेरात गुरू ऍनाबेला लेंझू यांच्या नृत्य दिग्दर्शनांतर्गत सादरीकरणाची संधी मिळाली, तर प्रथितयश कोरिओग्राफर लिंडा डायमंडसोबत काम करत असताना प्रसिद्ध अमेरिकन नृत्यांगना ऍना सक्लोचा नृत्याविष्कार सादर करण्याची संधी लाभली.
आजतागायत मॅथ्यू वेस्टर्बी, अपोलोनिआ होल्झर आणि डिना डेनिस या नावाजलेल्या कोरिओग्राफर्सबरोबर काम केल्याचे तिने सांगितले.
मी गेल्या एक वर्षात तीन कामं मिळवली आहेत. ‘इंपर्फेक्ट’ या मी सादर केलेल्या नृत्य चित्रपटास लुई ब्रुनेल मेमोरियल पुरस्कार आणि कलकत्ता इंटरनॅशनल फेस्टिव्हलचा पुरस्कार मिळाला आहे. मी स्वतः निर्माण केलेला नृत्याविष्कार ‘टेबल फॉर टू’ सध्या न्यूयॉर्क शहरात गाजत आहे, तर माझा नूतन कलाविष्कार ‘द फिटिंग रूम’ लवकरच ‘स्पोक द हब’ या ठिकाणी प्रकाशित होणार आहे, अशी माहिती रतीने दिली.
रतीची सामाजिक जाणीव तिच्या कार्यातून दिसते. 2019 पासून रती डी.एम.एफ यूथ या वंचित गटातील मुलांना मदत करणाऱया संस्थेत मुलांच्या मानसिक प्रगतीसाठी घेतल्या जाणाऱया नृत्यवर्गात प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. आपल्या स्वप>ांबद्दल रती म्हणते, विद्यार्थ्यांना बॉलीवूड नृत्याचे धडे देताना माझ्या मनात न्यूयॉर्क आणि मुंबई या दोन साधर्म्य असलेल्या शहरांना सांस्कृतिकदृष्टय़ा जोडण्याचं स्वप्न निर्माण झालं. तसंच सर्वांना स्वतःच्या शरीराचा, अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची कला नृत्यातून शिकवण्याचीही माझी इच्छा आहे.
>>मानिनी पाठक



























































