
माण-खटाव भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळूउपशाबाबत आधीच पाच तलाठय़ांचे निलंबन झाले आहे. आता यापाठोपाठ माण तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले याचे निलंबन झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हाधिकाऱयांकडे माण नदीवरील वाळूउपशाबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. मात्र, आमच्या भागात कोणतीही बेकायदा वाळू वाहतूक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून सांगितले जात होते. दरम्यान, एका कारवाई वेळचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप सातारा जिल्हाधिकाऱयांच्या हातात आली, यावरून जिल्हाधिकाऱयांनी पाच तलाठय़ांचे निलंबन केले होते. आता त्याच प्रकरणात माणचे तहसीलदार येवले यांचेही निलंबन झाल्याने महसूल विभागासोबत जिह्यात चर्चांना ऊत आला आहे. याआधी माण-खटावचे प्रांताधिकारी आणि माणचे तहसीलदार येवले या दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांचे थेट निलंबन झाल्याने महसूल विभागामधूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



























































