
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असतानाच आता स्वाइन फ्लूचे संकट जिह्यावर ओढवले आहे. स्वाइनची बाधित संख्या व मृत्यू यांच्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. आठवडाभरात स्वाइनच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिह्यात आजपर्यंत स्वाइनचे 7 बळी, तर बाधित आकडा 31 झाल्याने सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे.
कोरोना कमी होत असताना ऐन सणासुदीच्या वातावरणात स्वाइनने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस बाधित आकडा व मृत्यूंची संख्या वाढत असल्याने एकच धास्ती लागली आहे. गत आठवडाभरात हा आकडा 20 इतका होता. शुक्रवारी तब्बल 11 बाधित रुग्ण आढळले असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यात आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये कराड 3, खटाव 1, महाबळेश्वर 1, पाटण 1 व सातारा 1 अशा 7 जणांचा बळी गेला आहे. तर जावली 2, कराड 8, खंडाळा 1, खटाव 2, कोरेगाव 2, महाबळेश्वर 1, पाटण 2, सातारा 9, वाई 1 व इतर 3 असे एकूण 31 रुग्ण आढळले आहेत. यात कराड तालुक्यात सर्वाधिक बळी व सातारा तालुक्यात सर्वाधिक स्वाइनचे रुग्ण आहेत.
जिह्यात स्वाइनचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयाकडून संबंधित यंत्रणेला उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे व वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य केंद्र व रुग्णालयात औषधे व यंत्रणा सज्ज झाली आहे.































































