
लोकशाही उद्धवस्त करण्याचे भाजपचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी एकत्र या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पक्षांच्या नेत्यांनी विविध जिल्ह्यात दौरे करत पक्ष संघटना बळकट करावी, असेही त्यांनी सांगितले.
सध्या देशात आणि राज्यात ज्यांच्या हातात सूत्रे आहेत, ते सर्व एकाच विचाराचे आहेत. लोकांना विश्वास देण्याची भूमिका केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केली आणि त्याची प्रचिती मतदारांना मतदानाची संधी मिळाल्यानंतर येईल. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पाळली नसल्याचेही ते म्हणाले. 2014 मध्ये त्यांनी अच्छे दिनची घोषणा केली. मात्र, अच्छे दिन अजूनही आलेले नाही. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत न्यू इंडियाची घोषणा करण्यात आली. आता 5 ट्रिलियन इकोनॉमीचे आश्वासन देण्यात आले आहेत. यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. ही जनतेचा अनुभव आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल केली. अच्छे दिन, डिजिटल ग्रामपंचायतीपासून ते 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचं घर, 24 तास अखंडित वीजपुरवठा अशा विविध घोषणांवरून पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. सरकारने दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. त्यामुळे ज्यामुळे मतदारांना संधी मिळेल, तेव्हा त्याची प्रचिती येईल, असे शरद पवार म्हणाले. सरकार वचनं दिली, पण ती पाळली नाहीत.
देशात महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढतेय. गुजरातमध्ये बिल्किस बानोंवर अत्याचार झाला. बलात्कार करण्यात आला. त्यांच्या मुलीची हत्या केली. त्यांच्या कुटुंबातील लोकांची हत्या केली. यात कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाने दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ती आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिलेली असतानाही गुजरात भाजप सरकारने आरोपींना सोडले. तसेच त्यांचा जाहीर सत्कार केला गेला. देशाच्या पंतप्रधानांचे 15 ऑगस्टचे भाषण मी ऐकले. त्यात त्यांनी स्त्री सन्मानाची भूमिका आग्रहाने मांडली. मात्र, ते ज्या राज्यातून ते येतात, त्यांच्याच विचारांच्या तिथल्या सरकारने लाजिरवाणी कृत्य करणाऱ्यांना सोडलं. हे चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.
राजकारणातून विरोधकांवर कारवाई
राजकीय नेतृत्वाने काहीही कारणातून कुणावर खटले, कुणामागे ईडी, सीबीआय लावता येईल का, हे प्रकार सुरु आहेत. हे महाराष्ट्रातच नाही, गुजरात, झारखंडमध्येही हेच सुरू आहे. बिगर भाजपशासित राज्यातील सरकार आणण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. कर्नाटकात, महाराष्ट्रात सरकारे घालवले. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडले आणि भाजपचे आणलं. भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतेय, असा थेट आरोप शरद पवारांनी मोदी सरकारवर केला आहे. अनेक राज्यात जनतेने भाजपला कौल दिलेला नाही. तरीही आमदार फोडून, तपास यंत्रणांचा गैरवापर करत सत्ता मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे, त्याविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
राज्यात माजी गृहमंत्री अनिल देखमुख, नबाव मलीक यांच्यावरही राजकीय हेतूने कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या घरावर या तपास यंत्रणांनी अनेक धाडी टाकल्या. धाडी टाकण्याचा उच्चांक या सरकारने केला आहे. कोणत्या यंत्रणेने किती धाडी टाकल्या, त्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच पहिल्या आरोपपत्रात त्यांनी 100 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर तो आकडा 4 कोटी 60 लाखांवर आता अंतिम आरोपपत्रात 1 कोटी 71 लाखाच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 100 कोटींचा आरोप करत तो 1 कोटी 71 लाखांवर आणला आहे. ही बाब न्यायालयासमोर आल्यावर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यातून या यंत्रणा कशा वापरल्या जातात. ते दिसून येते. अशीच गोष्ट नवाब मलीक आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबतही घडली आहे, असे पवार यांनी सांगितले.
गुलाम नबी आझाद यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, सध्या भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असताना असे प्रकार घडायला नको, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भाजपविरोधात जो भूमिका घेईल, त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, अशा भूमिकेतून विविध कारवाया करण्यात येत आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी बैठकाही होत आहेत.
न्यायसंस्थेशी एवढी जवळीक पाहिली नव्हती
शिंदे गटाच्या एका आमदाराने सर्वोच्च न्यायालयातील वाद आणि निवडणूक चिन्हाबाबतचा वाद यावर केलेल्या विधानाबाबत ते म्हणाले, ते अशी विधाने करत आहेत, म्हणजे न्यायव्यवस्थेची त्यांची जवळीक दिसते. याआधी अशी जवळीक कधी पाहिली नव्हती, असे ते म्हणाले. मात्र, न्यायालयाच्या आगामी दोन तीन तारखांमध्ये या वादाचा निकाल येईल, असे आपल्याला वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या पक्षाचे काम करत आहोत, भाजपला चांगला पर्याय देण्यासाठी जे करायची गरज आहे, ते करत आहोत. त्यात कोणालाही आव्हान देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार प्रकरणात काय होणार याचे भाकीत भाजप नेत्यांनी आधीच केले आहे. चौकशी होण्याच्या आधीच असे होणार अशी भाकीते काही नेते करतात. कुठे धाड पडणार, कोण अडकणार याचे भाकीत ते आधीच करत आहेत. आता जनता हे सर्व बघत आहे. योग्य वेळ आल्यावर जनता काय तो निर्णय घेईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.




























































