
बुधवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात होत आहे. गणपतीबाप्पाच्या आगमनाची घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये उद्या 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तर 114 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता संपली असून उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. घरच्या गणपतीला चाकरमानी गावी येतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. अनेक चाकरमान्यांना गावी येता आले नव्हते. त्यामुळे यंदा चाकरमानी मोठ्या संख्येने घरच्या गणपतीसाठी गावी आले आहेत. गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सजावटी आणि मखराने घरे भरून गेली आहेत. अनेक घरांमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आज संध्याकाळपासूनच गणपतीबाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. उद्या सकाळी वाजतगाजत गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या मिरवणूका निघणार आहेत.
साडेतीनशे रेल्वेगाड्या, अडीच हजार बस आणि खासगी गाड्यांतून चाकरमानी गावात
यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आला आहे. कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी 294 गणपती स्पेशल रेल्वेगाड्या आणि नियमित धावणाऱ्या 45 रेल्वेगाड्या अशा एकूण 349 रेल्वेगाड्या सोडल्या. या सर्व गाड्या प्रवाशांनी तुडूंब भरून धावत होत्या. एसटीनेही अडीच हजाराहून अधिक बस सोडल्या. खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचीही चांगलीच चांदी झाली. खासगी बसेसचे तिकीट 1600 ते 1800 रुपयांच्या घरात होते. तरीही खिशाला कात्री लावून बाप्पासाठी चाकरमानी गावी आला आहे. अनेक चाकरमानी खासगी गाड्यांतूनही गावी दाखल झाले आहेत.
गणपतीपुळ्यात थेट गाभाऱ्यात दर्शन
श्रीदेव गणपतीपुळे मंदिरात 31 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत साध्या वेशात गाभाऱ्यामध्ये श्रींचे दर्शन घेता येणार आहे. एक गाव एक गणपती अशी परंपरा गेली पाचशे वर्षांहून अधिक काळ गणपतीपुळ्यात सुरु आहे. मंदिरातील गणपती हाच आपला गणपती मानून 5 गावातील ग्रामस्थ गणपतीपुळे मंदिरातील गणेशोत्सवात सहभागी होतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवात सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे यंदा पाचही गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह आहे.


























































