
जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून पर्यावरण संवर्धन आणि पूरक उपक्रम सुरू असून अंधेरी पूर्वमधील शिवगर्जना तरुण मित्र मंडळाने टिशू पेपरातून मरोळच्या मोरयाची 18 फुटी मूर्ती साकारली आहे. मंडळाचेे यंदा हे 55 वे वर्ष आहे.
सध्याचा काळामध्ये जागतिक तापमानवाढ, प्रदूषण याबाबत लोकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळ इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. अंधेरी पूर्वमधील शिवगर्जना तरुण मित्र मंडळ (मरोळचा मोरया) गेले काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असून त्यासाठी टिशू पेपरचा वापर करत आहे. या वर्षी मंडळाने 18 फुटी टिशू पेपरची कागदी मूर्ती साकारली आहे. गणेशाची मूर्ती ही टिशू पेपरची असून नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. फुले, निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी गणेश मंडपाशेजारीच व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष दीपक पुजारी, सरचिटणीस राकेश चाळके, खजिनदार दीपक चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल सुरू आहे.
स्वरकोकिळा लताजींच्या आरत्या, गाणी दहा दिवस वाजणार
स्वरकोकिळा भारतरत्न गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांच्या आवाजात गणपती बाप्पाच्या बहुतांश आरत्या ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, स्वर्गीय “लता मंगेशकर” यांना आदरांजली वाहण्यासाठी देखावा साकारण्यात आला असून गणेशोत्सवात दहा दिवस त्यांनी स्वरबद्द केलेल्या आरत्या आणि गाणी वाजवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकर पडवळ यांनी दिली.

























































