काव्यधारा: अज्ञात क्षितिजापाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीती मेहेंदळे

सर्वांना घेऊन पुढे वाहणारी नदी. तिच्या काठाशी सलगी करत तिला बिलगलेल्या लेकी तिच्या आपलेपणाचा वास अभिमानाने मिरवतात. या नदीच्या मुली, मत्स्यगंधाच जणू.   

मी अबोध कोवळझुला 

गंधारूढ केवळ झाला 

मी भिरभिर रुणझुण वाटा 

दंव सांभाळून ते नेता  

नावरलेला पक्षी मी 

निष्पाप नभी उडताना 

निर्व्याज वयाचे बंध   

उन्मुक्त उरी तुटताना 

 

लाटांचे काwतुक नुरले 

गाजेचे वैभव सरले 

उंबरे जुने परिघांचे 

मी विसरत दुमडत गेले 

 

ते अमृत संचित अंधुक 

मी नेत अनामिक देशी 

व्यक्तासक्ताच्या गाठी 

अज्ञात क्षितिजापाशी 

 

मूळ कविता ः लिहायचे मज आता

काव्यसंग्रह ः मावळत का नाहीस? 

लिहायचे मज आता, संदर्भ क्षितिजावरचे 

आभाळा लावून हात, मातीला धरतानाचे। 

लिहायचे मज आता… 

 

मी मुग्ध होऊनी फुलासवे गुणगुणले होते जेव्हा  

मी रसात न्हाऊन दवासवे भिजभिजले होते जेव्हा 

त्या उडून जाण्याच्या किमतीला काळीज विकतानाचे 

आभाळा लावून हात, मातीला धरतानाचे। 

लिहायचे मज आता… 

 

रंगबिरंगी बाष्पकणांच्या आकारातून फुटले 

मी टिपलेल्या पाण्याच्या थेंबागत आभाळा दिसले 

ते सीमारेषा विदीर्ण होऊन, परीघ विस्कटण्याचे 

आभाळा लावून हात, मातीला धरतानाचे। 

लिहायचे मज आता… 

 

ना हवेत काही गंधकणांचे ठिपकेही उरलेले 

ना डोळ्यांपुढती सुखस्वप्नांचे साचेही उरलेले 

ते स्मृती-स्मृतींचे खो-खो, विषामृत देतानाचे 

आभाळा लावून हात, मातीला धरतानाचे। 

लिहायचे मज आता… 

कवी ः मनीषा अतुल 

कवीचा संक्षिप्त परिचय   

मनीषा अतुल (मनीषा साधू) 

लेखिका स्वतः आहारतज्ञ आहे. 

साहित्यप्रपंचः कविता, कथा, कादंबरी, ललित व समीक्षा लेखन. 

मॉरिस कॉलेज व भिडे गर्ल्स ज्युनियर कॉलेज, नागपूर येथे 5 वर्षे अध्यापनाचे कार्य. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर येथे 12 वर्षे कार्यकारिणीत राहून साहित्यक्षेत्रात भरीव योगदान. 

वैदर्भीय कवी – लेखकांकरिता अनेक उपक्रम राबवले. 

एकूण प्रकाशित पुस्तके – 11 

धुक्याच्या पलीकडे, प्रहर, सटवाई, मुक्त मी, मावळत का नाहीस, सांवला चाँद असे एकूण सहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.  

दोन कादंबऱया ः पुन्हा एका सायंकाळी, पुरुषांच्या देशात व डेल्टा हा कथासंग्रह, वर्तनांचे परीघ, कल्पांताचे तांडे हे ललित लेखसंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.  

त्यांना  विदर्भ साहित्य संघ, वाङ्मय पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, मराठी बोली, पुणे यांचा 2020 चा ‘लोकसाहित्यिक पुरस्कार’ आणि अनेक उत्तम पुरस्कार लाभले आहेत.