मार्लेश्वर लिंगाचा डोंगराचे गिर्यारोहकांना आकर्षण; सात धबधब्यांचे मनोहारी दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर हे प्राचीन देवस्थान महाराष्ट्रातील एक प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मार्लेश्वरचे सात धबधबे आणि धारेश्वर विषयी अनेक हौशी पर्यटकांना आक्रषण आहे. मार्लेश्वर येथून लिंगाचा डोंगर स्थानाकडे जाण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो. या डोंगरावरुन गोठणे येथून येणाऱ्या सात धबधब्यांचे मनोहारी दर्शन होते.

मार्लेश्वर डोंगराचे जे उंच टोक आहे त्याला लिंगाचा डोंगर म्हणतात. तिथे गेल्यानंतर गोठणे पठारावरून पडणारे धबधबे आणि त्यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे धारेश्वर दिसतो. लिंगाचा डोंगरावर जाण्यासाठी अवघड ट्रेक आहे. विशेषतः पावसाळ्यात आंगवली आणि मारळ गावातून येथे तीन तासाची पायपीट करून जाता येते. रुळलेल्या वाटा नसल्यामुळे येथे जाण्यासाठी स्थानिक व्यक्तींना म्हणजेच वाटाड्यांना घेऊन जावं लागतं. एकूण पाच ते सहा डोंगरांची चढाई करून लिंगाचा डोंगर या स्थानावर पोहचता येतं. शेवटचा डोंगर हे महादेवाचे स्थान मानलं जात असल्यामुळे तिथे चपला बूट खाली ठेऊन चढाव लागतं.

हा डोंगर म्हणजे एक अवघड वाट असून फक्त एक निसरड्या उभ्या पायवाटेने सर करावा लागतो. त्यामुळे सवयीच्या लोकांनीच तिथे जावे हे महत्वाचे. दोन्ही बाजूने असणारी दरी आणि तोल जाण्यासाठी कारणीभूत ठरणारा प्रचंड वारा ही सततची आव्हाने येथे कायम असतात. डोंगरावर एक गुहा असून त्यात शंकराची पिंड आहे. गुहेपर्यंत जाणारी वाट ही कड्याला चिकटून आहे तिथे एकावेळी एकाला जाता येईल अशी धार आहे. आजूबाजूच्या गावातील लोक आणि गुराखी इथे नेहमी येत असतात. सहज जाऊन येता येईल असा हा ट्रेक नक्कीच नाही , त्यामुळे शक्यतो व्यवस्थित नियोजन करून आणि स्थानिक लोकांशी विचारविनिमय करूनच लिंगाचा डोंगर ट्रेक ठरवणे सोयीचे ठरेल.