
पुण्यात गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होत असून या गर्दीत चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पुणे स्टेशन येथून एकाला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीचे महागडे दोन मोबाईल जप्त केले आहेत. प्रेमकुमार ब्रम्हय्या पी (वय – 24, रा. जि. रंगारेड्डी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरात गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीत नागरिकाच्या मोबाईल चोरी गेल्याच्या देखील काही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पुणे स्टेशन परिसरात एकजण संशयितरित्या थांबला असल्याची माहिती अंमलदार मोहसिन शेख, प्रमोद कोकणे यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून प्रेमकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे महागडे दोन मोबाईल मिळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पुणे महापालिका परिसरातून हे मोबाईल चोरल्याचे कबूल केले. यानुसार प्रेमकुमार याला अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, अंमलदार शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, संजय जाधव, मोहसीन शेख, रेश्मा उकरंडे यांच्यासह पथकाने केली.


























































