
अंध तसेच दृष्टिहीन व्यक्तींना चलनातील नोटा ओळखणे सोपे जावे तसेच वापर अनुकूल बनवण्यासाठी कोणती साधने आणि पद्धती अवलंबता येतील याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तज्ञांकडून मत मागवण्याच्या सूचना याचिकाकर्त्यांना दिल्या आहेत.
चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे उच्च न्यायालयाने आरबीआयला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, चलनी नोटांमध्ये अनेक स्पर्शिक वैशिष्टय़े समाविष्ट केली आहेत, जेणेकरून दृष्टिहीन लोक या नोटा सहज ओळखू शकतील. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणाऱया अॅड. उदय वारुंजीकर यांना न्यायालयाने सांगितले की, याबाबत तज्ञांचे मत मागवा, जेणेकरून पूर्णतः किंवा अंशतः दृष्टिहीन नागरिकांसाठी नोटांचा वापर अनुकूल असेल.



























































