नगर-मनमाड महामार्गावर खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-मनमाड महामार्गावर खड्डा चुकविताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुरी शहरातील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडल्याने रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजय बोरुडे (वय 28, रा. बारगाव नांदूर रोड, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अजय बोरुडे हा गॅरेजचे काम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकविताना खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. परिसरातील व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी 108 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेस माहिती दिली. मात्र, बराच वेळेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. राहुरी पोलीस स्थानकाल माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी फिरकले नाहीत. जखमी अजयला इतर वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी राहुरीत शवविच्छेदनानंतर अजयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शिर्डी व शिंगणापूर या जागतिक ख्याती असलेल्या धार्मिक स्थळांकडे जाणारा सोयीचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या नगर-मनमाड राज्य महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडले आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पडलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. ठेकेदार काम सोडून गेल्याचे कारण सांगत अद्यापी या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

ऑक्टोबरमध्ये होणार होते लग्न
अजयचे ऑक्टोबरमध्ये लग्न होणार होते. लग्नानंतरच नवीन बांधलेल्या घरात प्रवेश होणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने अजयचे विवाह व गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले आहे.