
शिवसेना पक्षाचे अधिकृत ऍप असल्याचे भासवून सोशल मीडियावर सदस्य नोंदणी सुरू आहे. या ऑनलाईन पक्ष सदस्य नोंदणीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ऍपद्वारे अनधिकृतपणे सुरू असलेल्या अशा प्रकारच्या शिवसेना सदस्य नोंदणीपासून सावध राहून आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी दर दोन वर्षांनी होते. ही वार्षिक नोंदणी 19 जून 2022 रोजी सुरू झाली. ती 18 जून 2024पर्यंत सुरू राहील. पण ही ऑफलाईन स्वरुपाची नोंदणी आहे. त्यासाठी जिह्याच्या ठिकाणी अर्जाचे वितरण करून ते भरून घेऊन सदस्यांची नोंदणी केली जाते. या वेळी प्रथमच ऑनलाईन नोंदणीसुद्धा पक्षाने केली. पण ती केवळ एकच महिना होती. 19 जून 2022 रोजी सुरू होऊन ती 19 जुलै 2022मध्ये बंद झाली. या दोन्ही प्रकारच्या नोंदणीला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परंतु काही सोशल मीडियावर शिवसेनेच्या नावाने ऍप बनवून पक्षाचे अधिकृत ऍप असल्याचे भासवून नोंदणी सुरू आहे. परंतु अशा प्रकरच्या ऑनलाईन पक्ष सदस्य नोंदणीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अनधिकृतपणे ऍपद्वारे सुरू असलेल्या शिवसेना सदस्य नोंदणीपासून सावध राहून आपली फसवणूक टाळा, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



























































