कोल्हापुरात घरगुती गणेशाचे शांततेत विसर्जन, तब्बल तीन लाखांहून अधिक मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी येथील युवक पंचगंगा नदीत वाहून गेल्याची घटना वगळता जिह्यात सोमवारी शांततेत आणि भावपूर्ण वातावरणात घराघरांत विराजमान झालेल्या लाडक्या श्रीगणेशाला निरोप देण्यात आला. सुमारे 15 ते 18 तास विसर्जनास कालावधी लागला. नद्या, तलाव, विहिरी यामध्ये विसर्जनाला फाटा देत बहुतांश कोल्हापूरकरांनी मूर्तिदान चळवळीला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिह्यात सुमारे साडेतीन लाखांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले असले तरी यामध्ये जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण भागात अडीच लाखांहून अधिक, तर कोल्हापूर शहरात 55 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन झाले. कित्येकांनी आपापल्या घरीच मूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवात योगदान दिले.

पंचगंगा नदी तसेच जिह्यातील जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी यंदाही जिल्हा परिषदअंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 2 लाख 58 हजार 932 मूर्तींचे संकलन, तर सुमारे 516 टन निर्माल्य संकलन झाले. विशेषतः 1986 गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, कोल्हापूर शहरातही महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी खास कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यालाही कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून संकलित झालेल्या 55 हजार 344 गणेशमूर्तींचे इराणी खाणीत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. महानगरपालिकेसह विविध सार्वजनिक मंडळ, तालीम व संस्थांनीही कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती. घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सकाळपासून आज दुसऱया दिवशी पहाटे साडेचारपर्यंत कार्यरत होती. नागरिकांकडून संकलन झालेले एक हजारहून अधिक टन निर्माल्य विविध परिसरात स्वतंत्र खड्डा करून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी जमा करण्यात आले. तसेच कृत्रिम कुंड ठेवलेल्या ठिकाणांची स्वच्छता दुपारपर्यंत सुरू होती.